लॉकडाउनच्या फटक्यात उद्योगांची फरफट; अनेकांचा कायमचा रोजगार गेला 

factory.
factory.

जळगाव ः कोरोनाचे सावट असलेल्या सरत्या वर्षात तब्बल तीन-चार महिने उद्योग-व्यवसाय ठप्प होते. अनेकांवर कायमचा रोजगार गमावण्याची दुर्दैवी वेळ आली. अनलॉकनंतर लागोपाठ आलेल्या उत्सवकाळातही काही उद्योग-व्यवसाय अद्याप सावरू शकले नाहीत. सरकारच्या पॅकेजमुळे काहींना दिलासा मिळाला, पण तो पूर्ववत रोजगार मिळवून देण्यासाठी पुरेसा नव्हता. 


कोरोनामुळे मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन झाले. २२ मार्चला जनता कर्फ्यूनंतर २४ पासून लॉकडाउन सुरू झाले, तेव्हापासून तब्बल चार महिने कृषी आधारित उत्पादने व वस्तूंचे उद्योग-व्यवसाय वगळता सर्व उद्योग बंद होते. जीवनावश्‍यक वस्तू, औषधी वगळता सर्व व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंदच होती. पूर्णपणे लॉकडाउनचे तीन टप्पे जवळपास तीन-चार महिने चालले. 

पंधराशेवर उद्योग बंद 
जळगाव शहरासह जिल्ह्यातील जवळपास पंधराशेवर उद्योग या काळात पूर्णपणे बंद होते. ठिबक, पीव्हीसी पाइप व कृषी आधारित उत्पादनांच्या कारखान्यांना परवानगी असली तरी बहुतांश कामगार आपापल्या गावी परतल्याने या उद्योगांवरही त्याचा परिणाम झाला. जळगाव एमआयडीसीतील सुमारे हजारावर उद्योग या काळात बंद होते. 

मार्केटची स्थिती बिकट 
जळगाव शहर हे व्यापारी संकुलांचे शहर म्हणून ओळखले जाते. महापालिका व खासगी मालकीची लहान-मोठी ५०पेक्षा अधिक संकुले शहरात आहेत. तर या संकुलांमध्ये १३ हजारांपेक्षाही अधिक विविध स्वरूपाची व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. लॉकडाउनच्या काळात संकुले चार महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद होती. ऑगस्टमध्ये ती सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांसह तेथील कामगारांची स्थिती अत्यंत बिकट झाली. 

हजारो हात रिकामे 
लॉकडाउनच्या काळात उद्योग-व्यवसायातील सुमारे तीन-चार हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल ठप्प होती. व्यापारी व औद्योगिक प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या सुमारे २० हजारांहून अधिक कामगारांनी कायमचा रोजगार गमावला. त्यापैकी अनेकांनी आता भाजीपाला, फळे विकणे सुरू केले आहे. 


या प्रमुख क्षेत्रांना फटका 
उद्योग : चटई, पीव्हीसी पाइप, इंजिनिअरिंग वर्क्सचे कारखाने 
व्यवसाय : कापड, रेडिमेड गारमेंट्स, शोभा-सजावटीच्या वस्तू, टेन्ट, केटरर्स, लग्न समारंभ हॉल, व्यावसायिक छायाचित्रण, बॅन्ड, पूजापाठ करणारे पुरोहित, खासगी ट्रॅव्हल्स, सार्वजनिक प्रवासी वाहतूक, हॉटेल, हॉकर्स, चाट, स्वीट मार्ट, लॉजिंग 
बांधकाम क्षेत्र : प्रत्यक्ष विविध प्रकारचे काम करणारे कामगार, बांधकाम व्यावसायिक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, रंगांची दुकाने, सिमेंट, स्टीलसह बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे व्यापारी.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com