Sushma Andhare : मुक्ताईनगरात ठाकरे गटाला धक्का; सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Leader Sushma Andhare

सुषमा अंधारेंना शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.

Sushma Andhare : मुक्ताईनगरात ठाकरे गटाला धक्का; सुषमा अंधारेंच्या सभेवर घातली बंदी

जळगाव : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या सुषमा अंधारे (Shivsena Leader Sushma Andhare) या शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणानं शिवसैनिकांमधील जोश, उत्साह कायम ठेवला आहे. त्यामुळं त्यांच्या भाषणाची उत्सुकता शिवसैनिकांना लागून राहिलीय.

हेही वाचा: 'सुषमा अंधारेंच्या नादाला लागू नका, अन्यथा कुंभारावानी चिखलासारखं तुडवल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही'

सुषमा अंधारेंच्या सभेला बंदी

दरम्यान, आता जिल्ह्या-जिल्ह्यांत उद्धव ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्तानं (Mahaprabodhan Yatra) सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबद्दल युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना प्रशासनाकडून जिल्हा बंदी करण्यात आलीय. आता महाप्रबोधन यात्रेत आज मुक्ताईनगर (Muktainagar) इथं होणाऱ्या सुषमा अंधारेंच्या सभेलाही जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे. याबाबतचे आदेशही प्रशासनानं पारित केले आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचा माजी मंत्री जखमी; डोळा, डोक्याला दुखापत

जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेचं आयोजन

सुषमा अंधारेंची सभा रद्द झाल्यामुळं प्रशासनाच्या या निर्णयानं वातावरण आणखी तापलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीनं जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात सुषमा अंधारे यांच्या सभा होत आहेत. त्या बंडखोर आमदारांचा समाचार घेत आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात धरणगाव इथं पहिली सभा, त्यानंतर पाचोरा, एरंडोल तर काल चोपडा इथं सभा पार पडली.

हेही वाचा: 'मराठा समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभाय'; आरक्षणासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना साकडं

बंदीमुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कालच प्रशासनानं युवासेनेच्या शरद कोळींना भाषणबंदी तसेच जिल्हा बंदी केली होती. त्यामुळं शरद कोळींना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आलंय. तर, महाप्रबोधन यात्रेची मुक्ताईनगरात सभा होत आहे. सुषमा अंधारेंच्या या सभेला जिल्हा प्रशासनानं बंदी घातलीय. या बंदीमुळं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केलीय. मुक्ताईनगरातील महाप्रबोधन यात्रेच्या सुषमा अंधारेंच्या सभेला, तसेच शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याही महाआरतीच्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारल्यामुळं जिल्ह्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. महाप्रबोधन यात्रेची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम या दोन्ही कार्यक्रमांसाठी लावण्यात आलेले स्टेजही आता पोलिसांकडून काढण्यात आले आहेत.

हेही वाचा: भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे