चीन, काश्‍मीर मध्ये अधिवास असणाऱ्या "आर्वी'चे..."अंजनी' धरणात दर्शन ! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

भिंगरी, पाकोळी या पक्ष्यासारखे उडता उडता हवेतल्या हवेत आर्वी पक्षी हा किड्यांची शिकार करतो. म्हणून पाणभिंगरी या नावाने देखील त्याला ओळखले जाते

जळगाव ः अंजनी धरण परिसरात मोठा आर्ली (Oriental Pranticole)( शास्त्रीय नाव -Glareola maldivarum ) या पक्ष्याची तिसऱ्यांदा नोंद सोमवारी पक्षीनिरीक्षणात पक्षीमित्रांना झाली. त्यामुळे पक्षीगणनेत नव्या पक्ष्याची नोंद झाल्याचे माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. 

मागच्या वर्षी चांगला पावसामुळे धरण, तलावात पाण्याची पातळी यंदा चांगली आहे. त्यात पावसाळा लागल्याने सर्वत्र हिरवाई नटू लागली असून आता विविध पक्षी तलाव, धरण आदी परिसरात दिसू लागले आहे. त्यातच सोमवारी अंजनी धरण परिसर मोठा आर्ली या पक्षी अढळून आला. हा पक्षी नदी काठच्या गाळाच्या जमिनी, तलाव सरोवरे यांच्या किनारी असलेली गवताळ खुली मैदाने या ठिकाणी आढळतो. तर या पूर्वी या पक्ष्याची नोंद फेब्रुवारी 2013 साली बीपीटीएस तापी नदी येथे व मे 2018 मध्ये हतनूर धरणावर झाली आहे.अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी माहिती दिली. 

काश्‍मीर,चीन मध्ये आढळतो आर्ली 
गाडगीळ म्हणाले, की हा आर्ली पक्षी काश्‍मीर ते चीन या प्रदेशात अधिवास असून थंडीत दक्षिणेत उतरतो. याचे पाय आखूड आणि चोचही छोटी असते. बऱ्याच वेळा याचे डोके आणि पाठ तपकिरी असून निमुळत्या, टोकदार पंखांची काळी कडा उडताना स्पष्ट दिसून येतो. शेपटी दुभंगलेली असते. गवतातले किडे, नाकतोडे तसेच पाण्याजवळ उडणारे कीटक हे याचे अन्न आहे. 

हवेतल्या हवेत करतो शिकार 
भिंगरी, पाकोळी या पक्ष्यासारखे उडता उडता हवेतल्या हवेत आर्वी पक्षी हा किड्यांची शिकार करतो. म्हणून पाणभिंगरी या नावाने देखील त्याला ओळखले जाते. नर मादी दिसायला सारखेच असतात, कंठाला असलेली बारीक फिकट किनार विणीच्या, काळात गडद काळी होते आणि कंठ अधिक उजळ दिसू लागतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marath news jalgaon see "Early" bird in Anjani dam area