साठेबाजी, काळ्या बाजारा स्थितीने सिमेंट, स्‍टीलला फटका

सचिन जोशी
Tuesday, 29 December 2020

गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्र अडचणीत होते. त्यात मार्चपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाउन सुरू झाले आणि या क्षेत्राची स्थिती आणखीच बिकट झाली.

जळगाव : गेल्या काही महिन्यांत स्टील व सिमेंटचे दर तब्बल २५ ते ४० टक्क्यांनी वाढले असून, त्यामुळे पायाभूत सुविधा व रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती आणखीच बिकट झाली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झालेले असताना या दोन मुख्य घटकांच्या दरवाढीने क्षेत्राचे कंबरडेच मोडले आहे. यासंदर्भात क्रेडाईने पंतप्रधानांना पत्र देऊन दखल घेण्याची मागणी केली आहे. 
गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्र अडचणीत होते. त्यात मार्चपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाउन सुरू झाले आणि या क्षेत्राची स्थिती आणखीच बिकट झाली. अशातच या क्षेत्राला लागणारा सर्वाधिक महत्त्वाचा घटक असलेले स्टील आणि सिमेंटची प्रचंड दरवाढ झाली आहे. 

दोन्ही घटकांचा काळा बाजार 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीचा काही कंपन्या, साठेबाजांनी गैरफायदा घेत सिमेंट, स्टीलचा काळा बाजार सुरू केला आहे. या दरवाढीच्या संदर्भात विविध क्षेत्रांतील उद्योजक, मंत्री, नेत्यांनी विविध स्तरांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करून सरकारच्या निदर्शनास ही स्थिती आणून दिली आहे. 

गडकरींकडून इशारा 
काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरींनीही स्टील, सिमेंटच्या वाढत्या दरवाढीबाबत संबंधित उत्पादकांना इशारा दिला होता. तसेच पंतप्रधानांकडेही याबाबत मुद्दा उपस्थित करून चर्चा केली होती. तर वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी सिमेंट उत्पादक कंपन्यांना सूचना केली होती. मात्र, या बाबींचा कोणताही उपयोग झालेला नाही. उलटपक्षी दिवसेंदिवस ही दरवाढ अशीच सुरू आहे. 

सर्वाधिक प्रभावित क्षेत्र 
कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित क्षेत्र म्हणून रिअल इस्टेटकडे पाहिले जाते. कृषिक्षेत्रानंतरचे देशातील सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून पायाभूत सुविधा व रिअल इस्टेटचे क्षेत्र आहे. मात्र, या कोरोना महामारीचा फटका बसल्यानंतर या क्षेत्रातील चार कोटींवर रोजगार अडचणीत आला आहे. त्यातच या दरवाढीने हे क्षेत्र आणखी प्रभावित होत असून, केंद्र सरकारच्या परवडणारी घरे योजनेलाही दरवाढीचा फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी पंतप्रधानांना निवेदन दिले आहे. 

...असे वाढले दर 
घटक ---- जानेवारी २०२० -- डिसेंबर २०२० 
सिमेंट ---- ३५० ----------- ४३० (प्रतिबॅग) 
स्टील ---- ४० हजार ------ ५८ हजार (प्रतिटन) 
 
गेल्या आठ-दहा महिन्यांत स्टील व सिमेंटचे दर प्रचंड वाढले. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प, बांधकाम क्षेत्र अडचणीत आले आहेत. कोविडमुळे रोजगार संकटात असताना या दरवाढीने बेरोजगारी वाढेल. केंद्र सरकारने त्वरित दखल घ्यावी. 
-अनिस शहा (संयुक्त सचिव, क्रेडाई, महाराष्ट्र) 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jagalon news cement steel rate high last three month