अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरू 

उमेश काटे
Thursday, 24 December 2020

कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्याने विलंब होत असताना काहींनी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला.

अमळनेर (जळगाव) : तालुक्यात मार्केटिंग फेडरेशन कापूस खरेदी केंद्र शुक्रवार (ता. २५)पासून सुरू होणार असल्याची माहिती आमदार अनिल पाटील दिली. 
अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल पाटील सोमवारी (२१) मुंबईत गेले होते. त्या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन अमळनेर तालुक्यात कापूस खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याची विनंती केली होती. यावर त्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या अध्यक्षांना बोलावून केंद्र तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार २५ पासून केंद्र सुरू करण्याची कारवाई केली. 

शुक्रवारी शुभारंभ
आमदार पाटील सतत पाठपुरावा करीत होते. अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर अमळनेरात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू झाली. आमदार पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २४) दुपारी साडेतीनला लामा जिनिंग सेंटरमध्ये प्रारंभ करण्यात येणार असून, पणन संचालक संजय पवार, पंचायत समिती सभापती त्रिवेनाबाई पाटील, माजी पंचायत समिती सभापती श्‍याम अहिरे, तालुक्यासह निबंधक गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. 

शब्द ठरवला खरा 
कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास काही तांत्रिक अडचणी असल्याने विलंब होत असताना काहींनी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत सात दिवसांत कापूस खरेदी केंद्र सुरूच होणार, असा शब्द जाहीरपणे दिला होता, आमदारांनी त्यांचा शब्द खरा ठरविल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news amalner cotton kharedi center mla anil patil