
सीसीआयमार्फत मार्केटिंग फेडरेशन मका, खरेदी सुरू करण्यासाठी आग्रह केला. केंद्राकडे १५ हजार क्विंटल मका खरेदी सुरू करावी, यासाठी मागणी केली होती.
अमळनेर (जळगाव) : तालुक्यात कापूस खरेदीसाठी नावनोंदणी करताना कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही. कापसाचे शेवटचे बोंड मोजले जाईपर्यंत खरेदी सुरू राहणार असून, तालुक्यात तीन जिनिंगमध्ये मोजमाप सुरूच राहील, अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी येथील कापूस खरेदी केंद्राचा प्रारंभप्रसंगी दिली. तसेच प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस मिळावा, याबाबतही मागणी करू, असेही त्यांनी सांगितले.
पणन संचालक संजय पवार, माजी आमदार स्मिता वाघ, पणन माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, अर्बन बँकेचे प्रवीण जैन, समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, माजी पणन संचालक सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, सहाय्यक निबंधक गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील म्हणाले, की सीसीआयमार्फत मार्केटिंग फेडरेशन मका, खरेदी सुरू करण्यासाठी आग्रह केला. केंद्राकडे १५ हजार क्विंटल मका खरेदी सुरू करावी, यासाठी मागणी केली होती. केंद्राने फक्त साडेचार लाख क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता दिल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली.
केंद्राची दुरावस्था
संजय पवार म्हणाले, की कापसाच्या प्रतवारीमुळे कापूस प्रत खराब झाली. त्यासाठी वाढीव एक हजार रुपये बोनस मिळवून देण्यासाठी पणन महासंघाच्या वार्षिक सभेत मागणी केली होती. सध्या खानदेशात खरेदी विक्री केंद्राची दुरवस्था आहे. त्याला ऊर्जितावस्थेत आणणे गरजेचे आहे. कापूस पणन महासंघाचे निवृत्त कर्मचारी ए. बी. निकम यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमप्रसंगी स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. गणेश पवार यांनी विविध मागण्या केल्या. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब शिसोदे यांनी आभार मानले.
तीन केंद्रांवर होणार मोजमाप
येथील लामा जिनिंग, शिवशक्ती जिनिंग आणि लक्ष्मी जिनिंग अशा तीन ठिकाणी मोजमाप होणार आहे. सध्या एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दररोज दीडशे वाहने मोजमाप करण्यात येतील. तरी शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई न करता सर्वांचे मोजमाप होईल.
संपादन ः राजेश सोनवणे