ग्रामपंचायतीसाठी अर्ज भरायचाय..चारित्र्य प्रमाणपत्रासाठी फिराफिरकरण्यापुर्वी हे वाचा

किशोर पाटील
Saturday, 26 December 2020

निवडणूक अर्जासोबत केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची घोषणा पत्र दाखल करावे; असे नमूद केले आहे. परंतु अनेकांनी आपला अर्ज बाद होईल या भीतीपोटी चारित्र्य प्रमाणपत्रासाठी गर्दी करत असल्याची माहिती मिळाली.

अमळनेर (जळगाव) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत पोलिस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) जोडण्याची आवश्यकता नाही. उमेदवारांनी उमेदवारी अर्जासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत स्वयंघोषणा पत्र जोडावे, यात शिक्षा झाली असल्यास त्याचा उल्लेख करावा किंवा नसल्यास तोही करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अमळनेर तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. यासाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक अर्जासोबत केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची घोषणा पत्र दाखल करावे; असे नमूद केले आहे. परंतु अनेकांनी आपला अर्ज बाद होईल या भीतीपोटी चारित्र्य प्रमाणपत्रासाठी गर्दी करत असल्याची माहिती मिळाली.

अर्ज भरताना ही घ्‍या काळजी
अर्ज भरताना आवश्यक तिथे स्वाक्षरीसह भरावे. मतदार यादीतील अनुक्रमांक उमेदवार दुसऱ्या प्रभागातील असल्यास त्याबाबतचा उतारा सोबत जोडणे उमेदवाराचे ओळखपत्र पुरावे जोडणे, उमेदवाराचे नावात बदल असल्यास शपथ पत्र देणे उमेदवाराचे २१ वर्ष (वयाचा पुरावा), अनामत रक्कम अनामत ठेव पावती १जानेवारी १९९५ च्या नंतरचा जन्म असल्यास सातवी समकक्ष शैक्षणिक पात्रता आवश्यक, उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी, परिशिष्ट-१ भाग-१ वर स्वाक्षरी, परिशिष्ट -१ भाग २ वर स्वाक्षरी, परिशिष्ट-१भाग ३ वर स्वाक्षरी करावी असे कळविले आहे. उमेदवाराने मालमत्ता व दायित्व याचा तपशील पूर्ण रकाने भरणे. नोटरी करणे अपत्याचे घोषणापत्र, शौचालय, शपथपत्र/ स्वयंघोषणापत्र, थकबाकी/बेबाकी प्रमाणपत्र शौचालय दाखला प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र नसल्यास जात पडताळणी समितीकडे सादर प्रस्तावाची पावती, जात वैधता दाखल करणे बाबत हमीपत्र. महिलांसाठी सासरचे व माहेरकडील एकच नाव असल्याबद्दल शपथपत्र, निवडणुकी हिशोब ३० दिवसात द्यायचे हमीपत्र, बँक पासबुक राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचीमधील बँकेचे, बँक पासबुक जुने असल्यास झिरो बॅलन्स चिन्हांचा प्राधान्य क्रमांक, चिन्हांचा प्राधान्यक्रम नमुना उमेदवाराची नमुना स्वाक्षरी व निवडणूक प्रतिनिधीची स्वाक्षरी असावी, असे कळविले आहे.

"उमेदवारांना अर्जासोबत चारित्र्य प्रमाणपत्र दाखल करण्याची गरज नाही. अर्जासोबत केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत घोषणापत्र दाखल करावे.
- मिलिंद वाघ, तहसीलदार, अमळनेर

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news amalner gram panchayat election