esakal | अमळनेरला ऑक्सिजन प्रकल्पासाठी हालचाली गतिमान
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen plant

अमळनेरला ऑक्सिजन प्रकल्पासाठी हालचाली गतिमान

sakal_logo
By
टिम इ सकाळ

अमळनेर (जळगाव) : येथील ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी हालचाली सुरू केल्या असून, डीपीडीसीच्या माध्यमातून ६० लाख रुपये खर्चातून हा प्रकल्प उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तत्त्वतः मंजुरी दिल्याने लवकरच हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

आमदार पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांना पत्र देऊन प्रत्यक्ष चर्चादेखील केली आहे. त्यास हिरवा कंदील मिळाल्याने प्रकल्पासाठी योग्य जागा सुचवून तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, आमदार अनिल पाटील यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालय आणि इंदिरा भवनातील कोविड सेंटर व शहरातील सर्व खासगी कोविड हॉस्पिटलला भेटी देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी सामान्य व ऑक्सिजन बेडची उपलब्धता, ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा, इतर आवश्यक बाबी, रुग्णालयातील स्टाफची स्थिती जाणून घेत रेमडेसिव्हिर आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी तेथूनच जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा करत मागणी देखील केली. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अमळनेर तालुक्यात जास्तीत जास्त लसी उपलब्ध करण्याची मागणी आमदारांनी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी दोन दिवसांपूर्वी अमळनेर भेटीत अमळनेर स्थानिक प्रशासन कोरोना उपाययोजना राबविण्यात जिल्ह्यात अव्वल असल्याचे सांगून कौतुक केले होते. या बाबीचे आमदार पाटील यांनीदेखील कौतुक करून संपूर्ण प्रशासकीय टीमचे अभिनंदन केले.

प्लांटसाठी पालकमंत्र्यांना साकडे

अमळनेर येथे गंभीर रुग्णांना तत्काळ ऑक्सिजनची उपलब्धता होण्यासाठी अमळनेर येथे स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटचा आग्रह आमदारांचा असल्याने त्यांनी पालकमंत्री प्रशासनास पत्र दिले आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालय व इंदिरा गांधी भवन येथे एकूण ५५ ऑक्सिजनयुक्त खाटांच्या कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यातील गरज लक्षात घेऊन अमळनेर येथे ऑक्सिजन पुरवठा करणारा शासकीय ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती आमदार पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

रुग्णसंख्येत घट

या वेळी शहरातील सर्वच रुग्णालयांच्या भेटीत प्रत्येक ठिकाणी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त बेड्स खाली दिसून आल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केले. यामुळे रेमडेसिव्हिरची मागणीदेखील कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केवळ काही जण आजार अंगावर काढून उशिराने दाखल होत असल्याने रुग्ण गंभीर होत असल्याची माहिती अनेक डॉक्टरांनी दिली.

loading image