पाडळसरे धरण लवकरच पुर्णत्‍वास : आमदार अनिल पाटील

उमेश काटे
Wednesday, 27 January 2021

महाराष्ट्र शासनाने नाबार्ड २ मध्ये आणि केंद्रशासनाने प्रधानमंत्री कृषी संजिवनी योजनेतून धरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा; यासाठी लोकप्रतिनिधिंनी व प्रशासनाच्या सतत संपर्कात धरण जनआंदोलन समितीची आहे.

अमळनेर (जळगाव) : 'श्रेयवादाच्या भानगडीत न पडता पाडळसरे धरण पूर्तीसाठी राज्य शासन व केंद्र शासनाकडे सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींच्या सहयोगाने घेत असलेल्या परिश्रमाला लवकरच यश येईल. धरण पूर्ण क्षमतेचेच असेल.' असे प्रतिपादन आमदार अनिल पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
महाराष्ट्र शासनाने नाबार्ड २ मध्ये आणि केंद्रशासनाने प्रधानमंत्री कृषी संजिवनी योजनेतून धरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा; यासाठी लोकप्रतिनिधिंनी व प्रशासनाच्या सतत संपर्कात धरण जनआंदोलन समितीची आहे. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने समितीच्या कार्यालयात आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. समितीचे प्रमुख कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी धरणपूर्तीसाठी समितीची मागणी शासनाने पूर्ण करावी म्हणून ६ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पाडळसरे धरणासाठी केंद्र व राज्यातील राज्यकर्त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ करणे आवश्यक असल्‍याचे सांगितले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, सदस्य हिरामण कंखरे, हेमंत भांडारकर, प्रशांत भदाणे, अजय पाटील, देविदास देसले आदी उपस्‍थित होते. 

लवकरच मोठा निधी
आमदार पाटील यांनी आपण स्वतःला धरण समितीचे कार्यकर्ते समजतो म्हणून आमदार झाल्यापासून धरणाच्या कामाला गती मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. धरणाच्या कामातील अनेक तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम झाले असून लवकरच मोठा निधी उपलब्ध होईल असा आशावाद व्यक्त करतांना पूर्ण क्षमतेने आणि धरणाची मूळ उंचीही कायम राहील. राज्याचे जलसंपदा मंत्रीही धरणाला येत्या महिन्यात भेट देतील या दिशेने बोलणे सुरू असल्याचे याप्रसंगी उत्तर देतांना सांगितले.

जनआंदोलन समितीचा पाठपुरावा सुरूच!
धरण समितीच्या बैठकीआधी समितीचे पदाधिकारी  यांनी निम्न तापी प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य कार्यकारी अभियंता सौ रजनी देशमुख यांची भेट घेऊन धरणाच्या कामाबाबत सद्यस्थिती जाणून घेतली होती.मागील आठवड्यात खा.उन्मेष पाटिल, खा.हिनाताई गावित, मा.मंत्री.खा.डॉ.सुभाष भामरे, यांची भेट घेतली तर खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांना धरणाच्या निधीसाठी समितीने पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news amalner padalsare dam work fast mla anil patil