
लग्नानिमित्त मंगळवारी (ता. १२) गावाकडे आले होते. लग्न आटोपल्यावर कावपिंप्री (ता. अमळनेर) येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी ते पत्नी व चिमुकल्यासोबत भेटायला गेले होते अन् त्याच ठिकाणी ही घटना घडली.
अमळनेर (जळगाव) : कोणाचे मरण कुठे लिहिलेले असते, हे कोणालाच सांगता येत नाही. दीड वर्षाचा चिमुकला हा मोटारसायकलच्या चावीसोबत खेळत होता. खेळता खेळता मागील खोलीत गेला अन् त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या बादलीत चावी पडली. बादलीतून चावी काढताना पालथा झाल्याने पाण्याच्या बादलीत बुडून मृत्यू झाला अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले! श्लोक भटू पाटील असे त्या चिमुकल्याचे नाव आहे.
मंगरूळ (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी भटू युवराज पाटील नोकरीनिमित्त जळगाव येथे स्थायिक झाले आहेत. लग्नानिमित्त मंगळवारी (ता. १२) गावाकडे आले होते. लग्न आटोपल्यावर कावपिंप्री (ता. अमळनेर) येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी ते पत्नी व चिमुकल्यासोबत भेटायला गेले होते अन् त्याच ठिकाणी ही घटना घडली.
पुढल्या खोलीत गप्पांमध्ये सारे दंग
दुपारी चारच्या सुमारास नातेवाइकाकडे पुढच्या खोलीत गप्पा मारत होते. त्या वेळी श्लोक हा चिमुकला मोटारसायकलच्या चावीसोबत खेळत होता. खेळता खेळता मागील खोलीत तो गेला अन् त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या मोठ्या प्लॅस्टिकच्या बादलीत चावी पडली. क्रूर काळाने त्याच ठिकाणी घाला घातला अन् त्याच ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. चावी काढताना तो पालथा झाल्याने पाण्याच्या त्या बादलीत बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर पाहिले असता संबंधित घटना लक्षात आली.
डोळ्यात अश्रू अनावर
त्या चिमुकल्याला अमळनेरला खासगी दवाखान्यात आणले. मात्र घटनास्थळीच त्या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्याच्या मागे आजी-आजोबा, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात त्या चिमुकल्यावर मूळ गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
संपादन ः राजेश सोनवणे