पोलिसाने हटकल्याचा राग..रिक्षाचालकाने केले चक्‍क अपहरण 

रईस शेख
Friday, 18 December 2020

रिक्षा रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालकाला त्याचा राग आला. त्याने तू कोण मला सांगणारा.. तुला बघून घेतो असे म्हणत त्याने बडगुजर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली.

जळगाव : पोलिसाने रिक्षाचालकास हटकले, कारवाईसाठी पोलिसाला रिक्षात बसवून वाहतूक शाखेत नेण्याच्या नावाने सुसाट रिक्षा पळवत नेली. रिक्षा काही अंतरापर्यंत घेउन जात स्वत: च रिक्षा पलटी करुन अपघात घडवून आणला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचाराला नेण्याच्या बहाण्याने रुग्णालयात नेउन त्यांच्या नातेवाईकांना बोलावून पोलिसांच्या अंगावर धाउन आल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
सुभाष चौकात तुकाराम बडगुजर हे वाहतूक पोलिस ड्युटीवर होते. यावेळी चंद्रकांत अभंगे (वय ३०, रा. कंजरवाडा) हा त्याच्या (एमएच १९ व्हीडबल्यू ३६०५) क्रमांकाची रिक्षा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल याप्रमाणे लावून उभा होता. बडगुजर यांनी त्याला रिक्षा रस्त्यातून बाजूला घेण्यास सांगितले असता रिक्षाचालकाला त्याचा राग आला. त्याने तू कोण मला सांगणारा.. तुला बघून घेतो असे म्हणत त्याने बडगुजर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. या वादात बडगुजर यांनी त्याच्या रिक्षाचा फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने वाद वाढून तो, पोलिसाच्या अंगावर धावून आला. वादानंतर रिक्षा वाहतूक शाखेत जमा करण्यास नेण्याचे ठरले. मात्र, चालकाने रिक्षा वाहतूक शाखेत घेउन न जाता सिधीं कॉलनीच्या दिशेने पळवत नेत तिचा अपघात घडवून आणला. 

पोलिसांला दमदाटी 
कंजरवाडा जवळ असताना अपघात घडवून अभंगे याने नातेवाइकांना बोलावून पोलिसाला दमदाटी करत अपघातात जखमी झाल्याने दवाखान्यात घेवून जाण्यासह पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच जबरदस्तीने रिक्षाचालकासह वाहतूक पोलिसांना शहरातील नाहाटा रुग्णालयात घेवून गेले. याठिकाणी नातेवाईकांनी गर्दी करत कर्मचाऱ्‍याला शिवीगाळ केली. घडल्या प्रकाराची माहिती होताच साहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी धाव घेत पेालिस बंदोबस्त लावून गर्दी कमी केली. 

व्हीडीओ पुराव्यावरुन गुन्हा 
रिक्षाचालकाला वाहतूक पोलिस रिक्षा वाहतूक शाखेत घेउन जाण्याचे सांगत असतानाही रिक्षा दुसरीकडे पळविली. याप्रकाराचा वाहतूक पोलिसाने व्हिडीओ बनविला होता. साहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी माहिती घेवून सदर प्रकाराबाबत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात वाहतूक पोलिस कमलाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन रिक्षाचालक चंद्रकांत अभंगे याच्यासह इतरांविरोधात वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news auto riksha driver kidnapping police