esakal | श्रीरामांच्या नावानेही लुट; देणगीसाठी राममंदिराच्या नावाने बोगस पावत्‍या
sakal

बोलून बातमी शोधा

fraud receipts

विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कॅम्प कार्यालय, रामकोट, अयोध्या या नावाने केवळ शंभर रुपयांची अधिकृत छापील पावती देण्यात येते. जास्त रक्कम स्वीकारण्यासाठी ऑनलाइन खात्यात ती वर्ग करण्यासाठी संबंधित देणगीदारास सांगण्यात येते,

श्रीरामांच्या नावानेही लुट; देणगीसाठी राममंदिराच्या नावाने बोगस पावत्‍या

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : शहरातील गोलाणी व्यापारी संकुलात व्यावसायिकांकडून अयोध्येतील राममंदिर उभारणीसाठी बोगस पावती पुस्तके छापून पैसा गोळा करणाऱ्या भामट्याला शहर पोलिसांनी अटक केली. 

विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांतर्फे फिर्याद दाखल केल्यावरून गुन्हा दाखल झाला. अटकेतील भामटा राजेंद्र सोनवणे (वय ४०) आपण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असल्याचे सांगत होता. मात्र, खरे पदाधिकारी आल्यावर त्याची चौकशी होऊन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला कोठडीत रवाना केले. 

जनसामान्यांची लुट
विश्व हिंदू परिषदेतर्फे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र कॅम्प कार्यालय, रामकोट, अयोध्या या नावाने केवळ शंभर रुपयांची अधिकृत छापील पावती देण्यात येते. जास्त रक्कम स्वीकारण्यासाठी ऑनलाइन खात्यात ती वर्ग करण्यासाठी संबंधित देणगीदारास सांगण्यात येते, असे असतानाही शहर व जिल्हाभरात भुरट्या चोरट्यांनी थेट पावती पुस्तके छापून जनसामान्यांची लूट सुरू केल्याचे गुरुवारी (ता. १८) गोलाणी मार्केटमध्ये आढळून आले. 

पावती फाडताना रंगेहाथ पकडले
‘गोलाणी’त देणगीसाठी पावत्या फाडत असल्याची माहिती सुरेश लुल्ला यांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते राकेश लोहार यांना कळवली. लोहार, राजेंद्र नन्नवरे, देवेंद्र भावसार यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी गोलाणी व्यापारी संकुल गाठले. एक व्यक्ती पावती पुस्तक घेत वर्गणी गोळा करीत होता. विश्व हिंदू परिषदेच्या खऱ्या पदाधिकाऱ्यांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याच्याजवळ साईचैतन्य बहुद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषदद्वारा संचलित जळगाव शाखा अशा नावाने पावती पुस्तक आढळून आले. नुकतेच त्याने पाच पावत्या फाडून वर्गणी गोळा केल्याचे आढळून आले. त्या पावत्यांवर कुठलेही पावती क्रमांक नव्हता. त्याला तत्काळ शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. चौकशीनंतर तो तोतया असल्याचे संघटनेच्या पातळीवर स्पष्ट झाल्याने राकेश लोहार यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

संपादन ः राजेश सोनवणे