
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे रद्द झालेला पेपर आणि कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेश घेता आले नाही. या संदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
जळगाव : ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणुकीमुळे १५ जानेवारीची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची पुढे ढकलण्यात आलेली ऑनलाईन परीक्षा आता ४ फेब्रुवारीला होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील हिवाळी परीक्षांना ५ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. परंतु १५ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान असल्यामुळे या दिवशीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही ॲानलाईन परीक्षा ४ फेब्रुवारीला पूर्वीच्याच वेळेत होणार आहे. या दिवशी इन्व्हॉर्नमेंट स्टडीज याविषयाचा पेपर सकाळी ११ ते १२.३० या वेळेत होईल. तर जनरल नॉलेज विषयाची परीक्षा दुपारी ३.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.
महाविद्यालयीन प्रवेशाची मुदत वाढविली
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपली असली तरी विद्यार्थ्यांच्या विनंतीवरुन २५ जानेवारी पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
कोरोनामुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. प्रथम वर्षाचे ऑनलाईन वर्ग १ सप्टेंबरपासून सुरु झाले आहेत व उर्वरीत अभ्यासक्रमाचे वर्ग १ ऑगस्टपासून ऑनलाईन सुरु आहेत. महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया देखील संपली आहे. परंतू काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे केलेली विनंती लक्षात घेऊन बीए, बीकॉम, बीएस्सी प्रथम, व्दितीय, तृतीय वर्ष तसेच एमए, एमकॉम, एमएसडब्ल्यू या वर्गाना प्रवेश घेण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी २५ जानेवारीपर्यंत प्रवेश देण्यात यावा असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.