बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हेशाखेचे जळगावात बस्तान 

रईस शेख
Sunday, 10 January 2021

औद्योगिक वसाहत परिसरात मुख्य कार्यालय आणि जवळपास नऊ राज्यांमध्ये शाखा विस्तार असलेल्या बीएचआर पतसंस्थेत झालेल्या अपहारप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा दाखल केला.

जळगाव : बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे पथक तीन दिवसांपासून जळगावात मुक्कामी आहे. पुण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आवश्यक पुरावे, दस्तऐवज आणि संशयितांचा मागमूस काढण्याचा प्रयत्न या पथकाकडून सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या या गुन्ह्यात अद्यापही प्रमुख सूत्रधार तपास यंत्रणेला गवसला नसल्याने जळगावातून आणखी कुणाला अटक होते काय, याची उत्कंठा आणि भीती ‘बीएचआर’च्या व्यवहाराशी निगडित मंडळींमध्ये होती. 
औद्योगिक वसाहत परिसरात मुख्य कार्यालय आणि जवळपास नऊ राज्यांमध्ये शाखा विस्तार असलेल्या बीएचआर पतसंस्थेत झालेल्या अपहारप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा दाखल केला. दाखल गुन्ह्यात २९ नोहेंबर २०२० ला तपास पथकाने अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम सांखला यांच्या घर व कार्यालयांवर छापे टाकून जवळपास तीन ट्रक कागदपत्र, संगणक व इतर सामग्री पोलिसांनी जप्त करून पुणे येथे नेण्यात आली आहे. 

विचारपूस करत जाबजबाब
जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे दोघे प्रमुख सूत्रधार अद्यापही तपास यंत्रणेला सापडलेले नसून, अटकेतील इतर संशयितांतर्फे दाखल जामीन अर्जावर पुणे न्यायालयात कामकाज सुरू आहे. गुन्ह्याचा तपास सुरू असल्याने तीन दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे पथक जळगावला आले असून, त्यांनी संशयितांशी निगडित आणि दस्तऐवजांमध्ये नाव आलेल्या काही व्यक्तींची विचारपूस करुन जाबजबाब लिहून घेतले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhr parsanstha fraud jalgaon location of economic crimes branch