बीएचआर गैरव्यवहार..संशयितांना वाचविण्यासाठी पोलिसांवर दबाव? 

सचिन जोशी
Friday, 25 December 2020

मल्टिस्टेट दर्जा असलेल्या बीएचआर पतसंस्थेत संचालकांवरील कारवाईनंतर नियुक्त अवसायकानेही कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केल्यानंतर महिना उलटला तरी या प्रकरणी अद्याप मुख्य सूत्रधारांना अटक झालेली नाही. दुसरीकडे, हाती पुरावे असूनही तपास पुढे सरकत नसल्याने या प्रकरणी पोलिसांवर दबाव तर नाही ना, असा प्रश्‍न ठेवीदार व सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. 
मल्टिस्टेट दर्जा असलेल्या बीएचआर पतसंस्थेत संचालकांवरील कारवाईनंतर नियुक्त अवसायकानेही कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचे प्रकरण समोर आले. आर्थिक गुन्हे शाखेच्या पुण्यातील पथकांनी महिनाभरापूर्वी जळगावात संस्थेच्या मुख्य कार्यालयासह व्यावसायिक सुनील झंवर, ठेवीदार संघटनेचा नेता विवेक ठाकरे, सीए महावीर जैन व धरम सांखला यांच्या कार्यालयांवर छापे टाकत चौकशी सुरू केली. ठाकरे, जैन व सांखला यांना ताब्यातही घेण्यात आले. 

दोघे सूत्रधार फरारी 
मात्र, त्या वेळी अवसायक जितेंद्र कंडारे व व्यावसायिक झंवर फरारी झाले. आर्थिक गुन्हे शाखा पथकाने ट्रकभर कागदपत्रे पुरावे म्हणून जमा करत पुण्याला नेले आहेत. अटक केलेले चौघे अद्याप कोठडीत असताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला कंडारे व झंवर यांना अद्याप अटक झालेली नाही. 

पोलिसांवर दबावाची चर्चा 
कंडारेने संस्थेच्या मालमत्ता, जमिनी कवडीमोल विकल्यासह ठेवीदारांच्या पावत्या दलाली घेऊन ‘मॅच’ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, तर झंवरसह अन्य काही जणांनी या मालमत्ता कवडीमोल विकत घेतल्या, त्यामुळे हे सर्व जण चौकशीच्या रडारवर आहेत. पोलिस यंत्रणेकडे या संपूर्ण गैरव्यवहाराच्या संदर्भात पुरेशी कागदपत्रेही आहेत. मात्र, या प्रकरणी पुढील कोणतीही कारवाई करू नये म्हणून पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पोलिस अकार्यक्षम की..? 
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई सुरू केल्यानंतर ठेवीदारांमध्ये आशा निर्माण होऊन समाधान व्यक्त होत होते. मात्र, महिनाभरानंतरही या प्रकरणाचा तपास अद्याप पुढे सरकलेला नसल्याने ठेवीदारांमध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातील सूत्रधार कंडारे व झंवर इतके मोठे झाले, की त्यांना राज्याची पोलिस यंत्रणा पकडू शकत नाही. त्यांना पकडण्यात पोलिस सक्षम नाहीत की, त्यांच्यावर प्रकरण दडपण्याचा दबाव आहे, असा प्रश्‍न ठेवीदारांमधून विचारला जात आहे. 

सर्वपक्षीयांकडून दबाव
बीएचआर प्रकरणात सुनील झंवरचे नाव समोर आल्यानंतर ते भाजपनेते व माजी मंत्री गिरीश महाजनांचे निकटवर्तीय म्हणून उल्लेख होत आहे. मात्र, महाजनांनी त्याचा इन्कार करत झंवर सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे मित्र असल्याचा दावा केला. जर राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांमध्येही झंवर यांचे मित्र असतील तर अशा सत्ताधारी मंडळींकडूनही या प्रकरणी कारवाई होऊ नये म्हणून दबाव येत असल्याचे बोलले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhr patsanstha fraud case one month no progress