
बीएचआर घोटाळ्या प्रकरणी अटकेतील सीए महावीर जैन याच्या जामीन अर्जावर बुधवारी पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सरकार व बचावपक्षाने युक्तिवाद पूर्ण केला.
जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील संशयित आरोपी सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर सरकार आणि बचावपक्षाचा तब्बल तिसऱ्या दिवशी युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर अन्य संशयित आरोपी विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर युक्तिवादास सुरवात झाली आहे.
बीएचआर घोटाळ्या प्रकरणी अटकेतील सीए महावीर जैन याच्या जामीन अर्जावर बुधवारी पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. सरकार व बचावपक्षाने युक्तिवाद पूर्ण केला. या वेळी बचावपक्षाने सरकार पक्षाच्या युक्तिवादाला उत्तर देताना तत्कालीन ईओडब्ल्यूचे अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, त्याच अवसायक कंडारेला फॉरेन्सिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी, सीए जैनला का द्यायला लावली, या सरकार पक्षाच्या आरोपावर बचावपक्षाने उत्तर दिले, की काबरा फर्ममधील चोरडिया यांनी फॉरेन्सिक ऑडिटचा डिप्लोमा केलेला होता. त्यामुळे त्यांना फॉरेन्सिक ऑडिटची जबाबदारी देण्यात आली होती. फॉरेन्सिक ऑडिटचे बिल हे अवसायक कंडारे यांनी नव्हे, तर बीएचआर पतसंस्थेने दिले आहे. जर कुराडे यांची भूमिका संशयास्पद होती तर पोलिसांनी त्यांना का आरोपी केले नाही, असा बचावपक्षाने सवाल उपस्थित केला.
ठाकरेच्या जामिनावर युक्तिवाद
ठेवीदार समितीचे विवेक ठाकरे याच्या जामीन अर्जावर युक्तिवादात अॅड. उमेश रघुवंशी यांनी जोरदार बाजू मांडत म्हटले, की ठाकरे याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पोलिस त्याला एजंट म्हणत आहेत, परंतु त्यांनी याबाबत तसा कोणताही पुरावा कोर्टासमोर सादर केलेला नाही. वास्तविक बघता ठाकरे यांनी बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्या भ्रष्टाचार, कर्जदारांचे बेकायदेशीर मॅचिंगविरुद्ध अनेक वेळा दिल्लीपर्यंत तक्रारी केल्या आहेत. परिणामी जामीन द्यावा, अशी विनंती करण्यात आली. यावर पुढील सुनावणी आता १५ जानेवारीला होणार आहे. गुन्ह्यात अटकेतील चालक कमलाकर कोळी याला ५ जानेवारीला जामिनावर सुटका झाली. तसेच सुजित बाविस्कर (वाणी) याच्या अर्जाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, त्यावर अद्याप आदेश झालेला नाही.
संपादन ः राजेश सोनवणे