भुसावळला पाणीपुरवठा योजनेचा ‘स्रोत’च बदलला 

सचिन जोशी
Tuesday, 22 December 2020

जळगाव शहरात तीन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कामामुळे साडेपाच लाखांवर जळगावकरांना नरकयातना सोसाव्या लागत असताना भुसावळ शहरातही त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भुसावळातील या योजनेचे कामही जैन इरिगेशनने घेतले आहे.

जळगाव : ‘अमृत’ योजनेमुळे केवळ जळगावच नव्हे, तर भुसावळातील रस्त्यांचीही वाट लागली आहे. विशेष म्हणजे भुसावळ शहरात या योजनेचे काम सुरू असताना पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे थेट पाणीपुरवठ्याचा स्रोत बदलण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनावर येऊन ठेपली. त्यामुळे आता नव्या स्रोताद्वारे योजना राबविण्यात येणार आहे. 
जळगाव शहरात तीन वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या ‘अमृत’ योजनेच्या कामामुळे साडेपाच लाखांवर जळगावकरांना नरकयातना सोसाव्या लागत असताना भुसावळ शहरातही त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भुसावळातील या योजनेचे कामही जैन इरिगेशनने घेतले आहे. जळगावप्रमाणेच भुसावळ शहरातही दोन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू असून, त्यातही अनेक अडथळे येत असल्याने योजना रखडली आहे. 

स्रोतच बदलण्याची वेळ 
भुसावळ शहरातील स्थिती तर गंभीर आहे. या शहरासाठी योजना तयार केली तेव्हा पाणीपुरवठ्याचा स्रोत यावल मार्गावरील तापी नदीवरील पुलाखालच्या लोकेशनवर होता. त्या ठिकाणी डाउनस्ट्रीमवर छोटा बंधारा बांधून पाणी उचल करत शहराला पाणीपुरवठा करण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली होती. मात्र, योजनेंतर्गत जलवाहिन्यांचे काम सुरू झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने अचानक हा स्रोत तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे पत्र दिले. 

नवा स्रोत साकेगाव शिवारात 
त्यामुळे योजनाच संकटात आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नवा स्रोत शोधण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार वाघूर, तापी नदीच्या संगमाजवळ साकेगाव शिवारात हा नवा स्रोत शोधण्यात आला. त्यानुसार या ठिकाणी शेळगाव बॅरेजच्या बॅकवॉटवरच्या मृतसाठ्यातून पाणी उचलण्यात येणार असून, हा नवीन स्रोत कार्यान्वित करण्यात येणार आहे. 
 
तरीही केवळ ५० टक्केच काम 
या योजनेंतर्गत सुरू असलेले काम थंड बस्त्यात आहे. प्रत्यक्षात यासंबंधी कामाचे कार्यादेश ऑक्टोबर २०१७ मध्ये देण्यात आले. प्रत्यक्ष काम सुरू झाले जानेवारी २०१८ मध्ये. दोन वर्षांत केवळ शुद्ध जलवाहिनी व वितरण वाहिन्यांचे मिळून केवळ ५० टक्केच काम झाले आहे. जलकुंभांचे कामही अपूर्ण आहे. त्यामुळे भुसावळ शहरातील काम पूर्ण करण्याचे आव्हान मक्तेदार एजन्सीसह भुसावळ पालिका, मजिप्रासमोर आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal amrut yojna water supply