आंदोलन न करणाऱ्यांची भाजप प्रदेश कमिटीकडून दखल; खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी 

चेतन चौधरी
Sunday, 7 February 2021

भुसावळात भाजपने आंदोलन केले नव्हते. खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नसल्याचे कारण यामागे असल्याचे समोर आल्यानंतर निष्ठावान भाजपेयींमधून दिनेश नेमाडे यांना हटवण्याची मागणी पुढे आली होती.

भुसावळ (जळगाव) : वीजबिल माफीसाठी भाजपने जिल्हाभर महावितरणच्या कार्यालयांना टाळा ठोको आंदोलन केले होते. मात्र, भुसावळ आणि मुक्ताईनगरच्या भारतीय जनता पक्षात खडसे समर्थकांचे वर्चस्व असल्याने आंदोलन झालेच नाही. याची प्रदेश पातळीवरून दखल घेत, खडसे समर्थक शहराध्यक्षास हटवून निष्ठावंत परीक्षित बऱ्हाटे यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी (ता. ६) भुसावळ येथे झालेल्या बूथप्रमुखांच्या मेळाव्यात जाहीर केले. 
येथील लोणारी मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, संजय सावकारे, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, नगरसेवक युवराज लोणारी, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, मनोज बियाणी, राजेंद्र आवटे, श्री. बराटे, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, डॉ. नितू पाटील, निक्की बतरा, अजय नागरणी, पवन बुंदेले, रामाशंकर दुबे, अमोल महाजन, महिला आघाडीच्या शैलजा पाटील, मीना लोणारी आदी व्यासपीठावर होते. 
भुसावळात भाजपने आंदोलन केले नव्हते. खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नसल्याचे कारण यामागे असल्याचे समोर आल्यानंतर निष्ठावान भाजपेयींमधून दिनेश नेमाडे यांना हटवण्याची मागणी पुढे आली होती. पक्षानेदेखील ही बाब गांभीर्याने घेत शनिवारी शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात झालेल्या बूथ समितीच्या बैठकीत नेमाडे यांना डच्चू देत त्यांच्या जागी माजी नगरसेवक व रेल्वे सल्लागार समिती सदस्य असलेले बऱ्हाटे यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा आमदार भोळे यांनी केली. 
 
विजयाचे श्रेय बूथप्रमुखांचे 
गावपातळीवर काम करताना बूथरचनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. बूथप्रमुखाने व्यवस्थित रचना लावून जनतेशी संपर्क करणे महत्त्वाचे आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सशक्त बूथमुळेच भाजपचा विजय होऊन प्रत्येक उमेदवार बहुमताने निवडून आला आहे. याचे संपूर्ण श्रेय बूथप्रमुखाला जाते. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार रक्षा खडसे यांनी केले. 
 
आंदोलन टळल्याने वरिष्ठांनी घेतली दखल 
संपूर्ण राज्यात वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आंदोलन केले होते. मात्र, भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुका यास अपवाद ठरला. याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असताना, थकीत वीजबिलापोटी महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अशा आंदोलनात कार्यकर्त्यांनी सहभागी होत जनतेचे प्रश्‍न सोडवणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी चालेल मात्र आंदोलन थांबता कामा नये, अशा सूचना जिल्हाध्यक्ष भोळे यांनी या वेळी दिल्या. 
 
नवीन कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवा 
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी चांगली कामगिरी केली असून, ३२ पैकी २६ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात येतील, असा विश्‍वास आमदार सावकारे यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश हे बूथरचनेमुळेच मिळाले असून, आगामी निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रमाणे रचना मजबूत करून पक्षाचे विचारधारा आणि सरकारची कामे जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे आवाहन देखील त्यांनी उपस्थित बूथप्रमुखांना केले. तसेच या मेळाव्याला अनुपस्थित असलेल्या बूथप्रमुखांची चौकशी करून जे काम करण्यास इच्छुक नसतील, त्यांच्या जागी नवीन कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविण्याचा सूचनादेखील आमदार सावकारे यांनी केल्या. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal bjp state cameety interfering eknath khadse