esakal | दुचाकीवर जबरदस्‍ती बसवून नेत महिलेवर अत्‍याचार; एका महिलेशी वादानंतर घरी परततांना घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

torture

महिला मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील असून, पीडित महिलेचे भुसावळमधील महिलेशी एका प्रकरणात वाद झाल्यानंतर दोघांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर पीडित महिला गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर

दुचाकीवर जबरदस्‍ती बसवून नेत महिलेवर अत्‍याचार; एका महिलेशी वादानंतर घरी परततांना घडला प्रकार

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : महिलेला दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवारी (ता. २२) रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान घडली. अत्याचार केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पीडित महिलेला अज्ञात व्यक्तीने शहरातील दगडी पुलाजवळून लाल रंगाच्या दुचाकीवर बसवून जळगाव रस्त्याने वाय पॉइंटवरून पेट्रोल पंपाकडे घेऊन जात निर्जनस्थळी अंधारात दुचाकी थाबवून रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान महिलेवर अत्याचार केला. दरम्यान, नराधमाच्या तावडीतून पळून जाण्याचा महिलेने प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने महिलेला मारहाण करीत अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमांविरुद्ध बलात्कारासह ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

..एसपी घटनास्थळी 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, पोलिस कर्मचारी किशोर महाजन, सुनील सोनावणे, अनिल पाटील उपस्थित होते. दरम्यान, आरोपींच्या शोध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या शोध पथकातील कर्मचारी विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्ण देशमुख, रामण सुरळकर करीत आहेत. 

पीडित महिला मध्यप्रदेशातील 
पीडित ३५ वर्षीय महिला मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील असून, पीडित महिलेचे भुसावळमधील महिलेशी एका प्रकरणात वाद झाल्यानंतर दोघांनी सोमवारी सायंकाळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर पीडित महिला गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर २५ ते ३० वयोगटातील संशयित आरोपींनी महिलेला दुचाकीवर बसवून महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरवरील निर्जनस्थळी नेत मारहाण करीत अत्याचार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले. दरम्यान, संशयितांवर रात्री उशिरापर्यंत ओळख परेड सुरू होती. 

ठार मारण्याचा प्रयत्न 
दरम्यान, अज्ञात नराधमाने अत्याचार करून महिलेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने महिलेच्या डोक्यात मोठा दगड टाकण्याचा प्रयत्न केला असता पीडितेने वार चुकवून पळ काढत स्वतःचा जीव वाचवला. त्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाणे गाठत आपबिती सांगत फिर्याद दिली.  

संपादन ः राजेश सोनवणे