esakal | भुसावळ जंक्शन झाले 'लॉक' 

बोलून बातमी शोधा

weekend lockdown

वीकेंड लॉकडाउन सुरू होत असल्यामुळे शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासूनच शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत रात्री ये-जा करणारे वाहनधारक व पादचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली.

भुसावळ जंक्शन झाले 'लॉक' 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : कोरोनाची दुसऱ्या लाटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे राज्यात आठवडा व वीकेंड अशा दोन प्रकारांत मिनी लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पहिल्याच वीकेंडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. त्यामुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता शुकशुकाट दिसून आला. 
वीकेंड लॉकडाउन सुरू होत असल्यामुळे शुक्रवारी (ता. ९) रात्रीपासूनच शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत रात्री ये-जा करणारे वाहनधारक व पादचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात आली. त्यानंतर शनिवारी (ता. १०) शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. शिवाय रस्त्यांवर लागणाऱ्या गाड्याही शनिवारी दिसून आल्या नाही. शहरात पोलिस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील नाहाटा चौफुली, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी चौक, सराफ बाजार, आठवडेबाजार, खडका चौफुली, राजा टॉवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, यावल रोड, जुना सातारा, खळवाडी भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात कडक संचारबंदी दिसून आली. अत्यावश्यक सेवा व नोकरदार वर्गासह काही तुरळक नागरिकच रस्त्यावर दिसून आले. 

रविवारचा बाजार 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रविवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. मात्र, काही वितरक हे रविवारच्या बाजारात दाखल होत होते. या वेळी पोलिसांनी त्यांना थांबवून परत माघारी पाठविले. 

कमी क्षमतेने बससेवा सुरू 
राज्यात वीकेंड लॉकडाउन असल्यामुळे सर्वत्र कडकडीत बंद होता. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कमी क्षमतेने बससेवा सुरळीत सुरू होती. बसस्थानकावरील प्रवाशांची वाढती संख्या पाहता काही गाड्या सोडण्यात आल्याने ताटकळत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला. 

यावल शहरात प्रतिसाद 
यावल : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातही संचारबंदीला शनिवारी (ता. १०) व रविवारी (ता. ११) नागरिकांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावल तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या टप्यात वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी यावल शहरातील व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले. या दोन दिवसीय संचारबंदी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यासाठी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक अजमल खान, सर्व पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी तसेच नगरपरिषदचे शिवानंद कानडे, स्वप्नील म्हस्के, विजय बडे, राजेंद्र गायकवाड हे संचारबंदीच्या परिस्थितीवर नजर ठेवून होते. 

जामनेर रस्ते निर्मनुष्य 
जामनेर : शहरासह परिसरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, हातगाडी, फेरीवाल्यांनी शनिवारी व रविवारी सकाळपासूनच बंद ठेवल्याने वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद मिळाला. रस्ते, चौकांमध्ये कमालीचा शुकशुकाट दिसत होता. वाहनांचीही वर्दळ तुरळक होती. पोलिस व पालिका प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी परीरिस्थितीवर नजर ठेऊन होते. एवढे असले तरी दुसरीकडे मात्र वीकेंड लॉकडाउननंतर आणखी अवधी वाढविण्यात येतो की काय? अशी रास्त भीतीही लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये होती. त्यामुळे ते एकमेकांशी याच मुद्यावर चर्चा करताना दिसत होते.