ढाब्‍यावर सारे जेवत असताना अचानक उडाला गोंधळ; पोलिसांकडून सहा जण ताब्‍यात

चेतन चौधरी
Wednesday, 20 January 2021


ढाब्‍यावर सर्वजण जेवण करत असताना अचानक पाच– सहा जण आले आणि चाकू काढत दहशत माजविली. हॉटेल मालकाला धमकावत त्‍यांनी गोंधळ घातला आणि काउंटरवरील पैसे काढून पसार झाले.

भुसावळ (जळगाव) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यावर चाकुचा धाक दाखवत चोरट्यांनी सात हजार रूपये लुटल्याची घटना सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी बाजार पेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने सहा जणांना अटक केली आहे. 

राष्ट्रीय महामार्गावर पंजाब खालसा ढाब्यावर काही इसमांनी येत चाकू काढून ढाबा चालक सारंगधर पाटील यांना ‘तू माझ्याविरुद्ध मागे बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे, तो वापस घे’ असे म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासह ढाब्यातील सामानाची तोडफोड करून काउंटर टेबलच्या गल्ल्यातून रोख रक्कम 7 हजार रूपये बळजबरीने काढून नेले. या प्रकरणी दाखल गुन्ह्यावरून बाजारपेठे पोलिसांनी शेख रिजवान उर्फ बबलू शेख अशपाक (वय-20 रा.मुस्लिम कॉलनी भुसावळ), परवेज हमीद कुरेशी (वय-24, रा.आगाखान वाडा भुसावळ), सय्यद वसीम सय्यद (वय-33,रा.पंचशील नगर भुसावळ), शेख नईम शेख सलीम (वय-33 रा.दीनदयाळ नगर भुसावळ) समीरउद्दीन अमिनोउद्दीन (वय-25,रा.शनी पेठ जळगाव) यांना भुसावळ शहरातून खडका चौफुली वरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. 

अन्‌ आरोपीने स्‍वतःला मारली कात्री
मुख्य आरोपी आसिफ उर्फ बाबा काल्या असलम बेग (वय 25 रा.अयान कॉलनी भुसावळ) यास मुस्लिम कॉलनी भागातून ताब्यात घेण्यासाठी पोलिस गेले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. एवढ्यावरच थांबला नाही, तर स्वतःला कात्री मारून घेतली. यानंतर त्‍यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे आदींनी केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal national highway hotel robbery police arrested