रेल्‍वेचा माल चोरीला अन्‌ अधिकारी गेले लिलाव करायला; बोली लागण्यापुर्वीच उडाला गोंधळ

चेतन चौधरी
Thursday, 7 January 2021

रेल्वे अधिकारी अनभिज्ञ असल्याने अद्यापही चोरीबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. रेल्वेचे लाखो रुपयांचे साहित्य चोरी होत असताना रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

भुसावळ (जळगाव) : रेल्वे प्रशासनाने हद्दीवाली चाळ परिसरातील जीर्ण झालेल्या रेल्वे निवासस्थाने तोडून तेथील साहित्य विक्रीचा लिलाव रेल्वेच्या वरिष्ठ अभियांत्रिकी विभागात करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष रेल्वेच्या निवासस्थानांची पाहणी केली असता, जीर्ण क्वाटर्सचे अर्ध्याहून अधिक दरवाजे, खिडक्या आणि इतर लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याचा आरोप लिलावधारकांनी करीत यास विरोध केल्याने ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. याबाबत रेल्वे अधिकारी अनभिज्ञ असल्याने अद्यापही चोरीबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. रेल्वेचे लाखो रुपयांचे साहित्य चोरी होत असताना रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लिलावाला सुरवात होण्यापुर्वीच..
रेल्वेच्या हद्दीवाली चाळ परिसरातील 73 जुने निवासस्थाने तोडून त्यातून निघणारे साहित्य विक्रीसाठी 5 लाख 32 हजार 970 रुपये किंमतीची लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास यासाठी बोली लागणार होती. मात्र बोली लागण्याच्या अगोदर लिलावधारकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता, हे क्वाटर्स तोडण्यात येऊन, येथील सागवान लाकडाचे दरवाजे, खिडक्या, पत्रे, लोखंडी अँगल, पाणी पुरवठ्याची लोखंडी पाईपलाईन आदी साहित्य क्वार्टर्सच्या तुलनेत अत्यल्प दिसून आले. केवळ दोनच खोल्यांमध्ये साहित्य ठेवण्यात आले आहे. उर्वरित साहित्य हे ट्रकद्वारे चोरीस नेऊन विक्री केल्याचा आरोप लिलावधारकांनी केला आहे. यावेळी लिलावधारकांनी अधिकाऱ्यांसमोर गदारोळ केल्याने तणाव निर्माण झाला असता, आरपीएफ कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले होते. लिलावाच्या किमतीच्या तुलनेत हे साहित्य कमी असल्याने केवळ उर्वरित साहित्य नमूद करून तितक्याच किमतीची लिलाव प्रक्रिया घेण्यात यावी, अशी मागणी लिलावधारकांनी केल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.

रेल्वे क्वार्टर्स मधील साहित्याचे विवरण
प्रशासनातर्फे 73 रेल्वे क्वार्टर्स पाडण्यात येणार होते. यात प्रत्येक क्वाटर्स मधील साहित्याचे विवरण पुढीलप्रमाणे
दरवाजे - एका क्वार्टर्स मध्ये प्रत्येकी 5 यानुसार 73 क्वार्टर्स चे 365 दरवाजे.
खिडक्या - प्रत्येकी 2 नुसार एकूण 146
लाकडी बॉटम - 219
लोखंडी अँगल - 219
लोखंडी पाईपलाईन- 500 फूट
सिमेंट पत्रे - 365 
इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य या क्वाटर्समधून मिळणे आवश्यक होते, मात्र याच्या केवळ 25 टक्केच साहित्य या ठिकाणी असल्याचा आरोप लिलावधारकांनी केला आहे.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal railway department auction railway goods