मुंबई- दिल्ली प्रवास अवघ्या १९ तासात 

चेतन चौधरी
Thursday, 24 December 2020

गाडीचे बुकींग विशेष शुल्कासह २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवास करता येणार आहे. 

भुसावळ (जळगाव) : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विशेष रेल्वे बुधवार(ता.३०)पासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अवघ्या १९ तासात प्रवासी दिल्ली गाठता येणार आहे. नाताळ आणि हिवाळ्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
दर सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवारी मुंबईहुन दुपारी ४ वाजून १० मिनीटांनी सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन स्टेशनला ११ वाजता पोचेल. ही गाडी नाशिकला सायंकाळी ६ वाजून ४३ मिनीटांनी, जळगावला रात्री ९ वाजून १० मिनीटांनी, भोपाळ, झांसी, आगरा येथे थांबा देण्यात आला आहे. अप ०१२२२ हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी गुरुवार, ३१ डिसेंबरपासून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारी हजरत निजामुद्दीन येथून दुपारी ४ वाजून ५५ मिनीटांनी सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबई स्टेशनला सकाळी ११ वाजून ५० वाजता पोहोचणार आहे. ही गाडी जळगावला पहाटे सहा वाजता, नाशिक स्थानकावर ८.३० वाजता पोचणार आहे. या गाडीचे बुकींग विशेष शुल्कासह २५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवास करता येणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal railway mumbai delhi traveling