esakal | कमी गर्दीचा घेतला जातोय फायदा; धावत्‍या रेल्‍वेत घडल्‍या घटना अन्‌ झाल्‍या उघड
sakal

बोलून बातमी शोधा

railway


कोरोनामुळे गेल्‍या वर्षभपासून रेल्‍वेकरीता निर्बंध कायम राहिले आहेत. रेल्‍वेतून प्रवास करताना आरक्षणाशिवाय परवानगी नाकारण्यात आली आहे. अर्थात गर्दी कमी असते. या कमी गर्दीचा फायदा घेतला जात असून धावत्‍या रेल्‍वेतच हात साफ केला जात आहे. अशा चार घटना उघडकीस आल्‍या आहेत.

कमी गर्दीचा घेतला जातोय फायदा; धावत्‍या रेल्‍वेत घडल्‍या घटना अन्‌ झाल्‍या उघड

sakal_logo
By
चेतन चौधरी

भुसावळ (जळगाव) : कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. हळुहळू रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ झाली. रेल्वेगाड्यांची संख्या वाढत असताना रेल्वेगाड्यात गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. प्रवाशांचे मोबाईल आणि महागड्या वस्तू ते पळवित असून, शनिवारी (ता. २०) वेगवेगळ्या चार गाड्यामध्ये चोरी झाल्याने रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवजीवन एक्स्प्रेसमधून लॅपटॉप लांबविले 
गाडी क्रमांक ०२६५६ अहमदाबाद- चेन्नई नवजीवन एक्सप्रेस कोच क्रमांक एस/४ बर्थ क्रमांक २३ वरून राहुल शेट्टी (रा. वारंगल आंध्र प्रदेश) हे प्रवास करत असताना चोरट्याने सकाळी ७:२० वाजेच्या सुमारास भुसावळ स्थानक येण्याच्या दहा मिनिट अगोदर काळा कलरची बॅग लांबवली. यामध्ये ४५ हजारांचा लॅपटॉप, फोन, हेडफोन असा एकूण ४७ हजाराचा मुद्देमाल होता. तपास पोलिस नाईक संतोष जंजाळकर करीत आहे. 

गोरखपुर एक्सप्रेस मधून ५० हजाराची चोरी 
गाडी क्रमांक ०१०१५ डाऊन एलटीडी गोरखपुर या गाडीने संपत प्रजापति (वय ६०, रा. महुवा तहसील बलरामपुर, उत्तर प्रदेश) हे कोच क्रमांक एस/२ बर्थ क्रमांक ६६ वरून शुक्रवारी (ता. १९) प्रवास करीत असताना त्यांच्या खिशातील ५० हजार रोख झोपेचा फायदा घेत चोरट्याने लांबविले. ही घटना नाशिक स्थानक येण्याच्या वीस मिनिटात पूर्वी घडली. भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी शून्य क्रमांकवरून गुन्हा नाशिक लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. 
 
दनापूर एक्सप्रेसमध्ये दागिने चोरी 
पुणे- दानापूर रेल्वे गाडीतून धीरजकुमार गौतम (रा. संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) हे या गाडीच्या एस-९ या डब्याच्या सीट ७ व ८ वरून प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानक येण्यापूर्वी चोरट्याने महिलेची लाल रंगाची पर्स लांबविली. त्यात १० हजार रूपये रोख, दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, मेकअपचे साहित्य असा १८ हजारांचा ऐवज होता. 

२४ हजाराचा ऐवज लंपास 
चेन्नई- अमदाबाद नवजीवन एक्स्प्रेसच्या एस- ५ या डब्यातील ४३ व ४४ नंबरच्या सीटवरून भाग्यलक्ष्मी सुब्रमण्यम (रा. शंकर नगर, चैन्नई) या चेन्नई ते अहमदाबाद असा प्रवास करीत असताना गुरूवारी (ता. १८) पहाटे साडेपाच वाजता अकोला रेल्वे स्थानकाजवळ सुब्रमण्यम यांची पर्स चोरट्यांनी झोपेचा फायदा घेत चोरून नेली. यात दोन हजार रुपये रोख, एटीएम कार्डसह अन्य साहित्य मिळून २४ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image