खानदेशची जीवनवाहिनी पूर्ववत धावणार; भुसावळ-सुरत पॅसेंजरसह नंदुरबार गाडीत अनारक्षित प्रवाशांना परवानगी

चेतन चौधरी
Sunday, 7 March 2021

आरक्षणशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. परंतु, आता खानदेश वासीयांची जीवनवाहिनी असलेल्‍या भुसावळ- सुरत पॅसेंजरसह भुसावळ-नंदुरबार या गाड्या अनारक्षित प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. 

भुसावळ (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढते संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाउनपासून देशातील सर्व रेल्‍वेगाड्या बंद करण्यात आल्‍या होत्‍या. अनलॉकनंतर एक्‍स्‍प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्‍या आहेत. हळूहळू यात वाढ झाली, मात्र यात आरक्षणशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. परंतु, आता खानदेश वासीयांची जीवनवाहिनी असलेल्‍या भुसावळ- सुरत पॅसेंजरसह भुसावळ-नंदुरबार या गाड्या अनारक्षित प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. 

रेल्वेने भुसावळ- बांद्रा टर्मिनस दरम्यान त्री साप्ताहिक आणि भुसावळ - सुरत/नंदुरबार  प्रतिदिन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ -बांद्रा टर्मिनस त्री साप्ताहिक विशेष गाडी क्रमांक -09014 अप विशेष 7 मार्च पासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार ला भुसावळ हुन सायंकाळी 5.40 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी बांद्रा टर्मिनस येथे पहाटे 4.30 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक - 09013 डाऊन 7 मार्च पासून दर मंगळवार, गुरुवार, रविवार ला बांद्रा टर्मिनस हुन रात्री 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे दुपारी 12 वाजता पोहचेल. ही गाडी मार्गात जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा,नंदुरबार, नवापूर, बारडोली, भेस्थान , नवसारी, बलसाड, पालघर, विरार, बोरविली येथे थांबेल.

भुसावळ-सुरत दैनिक विशेष गाडी क्रमांक -09008 अप विशेष 2 मार्च पासून सुरू करण्यात आली होती. मात्र यात केवळ आरक्षित प्रवाशांना प्रवेश दिला जात होता. आता यातील सामान्य श्रेणी डब्यात अनारक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही गाडी दररोज भुसावळ हुन रात्री 8.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी सुरत येथे पहाटे 6 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक - 09007 डाऊन दररोज सुरत हुन सायंकाळी 5 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी भुसावळ रात्री येथे रात्री 1.30 वाजता पोहचेल. या गाडीला जळगाव, धरणगाव, अमळनेर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, खांडबारा, नवापूर, उकाई सोनगढ, व्यारा, मढी, मॅन्ग्रोला, बारडोली, गंगाधरा, बागुमरा, चलथान, उधना या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. 

नंदुरबार विशेष गाडी
भुसावळ- नंदुरबार दैनिक विशेष गाडी (क्रमांक 09078) अप विशेष दररोज भुसावळ हुन 9 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी नंदुरबार येथे दुपारी 1.40 वाजता पोहचेल. गाडी (क्रमांक 09077) डाऊन नंदुरबार हुन दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे सायंकाळी 7.20 वाजता पोहचेल. ही गाडी जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक्स ,पाडसे ,बेटावद, नरडाणा, होल, शिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाला, तिसी, चौपाले येथे थांबेल.

स्लीपर क्लासचे 3 कोच आरक्षित
भुसावळ-सूरत आणि भुसावळ-नंदुरबार या गाडीत स्लीपर क्लासचे 3 कोच आरक्षित असतील व उर्वरित कोच अनारक्षित असतील. सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित तिकिटे दिली जातील, या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत. प्रवाशांनी रेल्वे प्रवासात सामाजिक अंतर आणि मास्क घालून कोरोना चे नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सुरतसाठी मेल एक्सप्रेसचे भाडे
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली भुसावळ- सुरत पॅसेंजर आरक्षित विशेष गाडी अनारक्षित विशेष गाडी म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ- सुरत गाडीकरीता मेल एक्सप्रेस चे भाडे आकारले जाईल. तर भुसावळ -नंदुरबार करीता पॅसेंजर चे भाडे निश्चित करण्यात आले आहे.
 
संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal surat passenger start bhusawal nandurbar railway