केवळ पुस्तकांचे पैसे भरण्यावर झाले एकमत; शाळेच्या शुल्‍क वसुलीविरोधात पालक एकवटले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

कोरोनामुळे यंदा शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके दिली आहेत. शाळेचा सर्वच खर्च कमी झाला आहे. स्मार्ट क्लास, स्पोर्ट्स, अॅक्टिव्हीटी, गणवेश, बूट, वीज, स्वच्छता, पाणी आदींचा खर्च वाचला आहे.

भुसावळ (जळगाव) : कोरोनामुळे यंदा संपूर्ण शैक्षणिक वर्षात अध्यापन झाले नाही. मात्र, सध्या शहरातील ताप्ती पब्लिक स्कूल या सीबीएससी पॅटर्नच्या शाळेकडून पालकांना सक्तीने शुल्क वसुलीसाठी निरोप दिले जात आहेत. या प्रकरणी तब्बल ३०० पालकांनी बैठक घेऊन शाळेला केवळ पुस्तकांपोटी झालेला खर्च द्यावा, इतर शुल्क भरू नये, असा निर्णय घेतला. येत्या दोन दिवसांत पालकांचे शिष्टमंडळ शाळेच्या संचालकांसोबत भेट घेणार आहे. 

कोरोनामुळे यंदा शाळेने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके दिली आहेत. शाळेचा सर्वच खर्च कमी झाला आहे. स्मार्ट क्लास, स्पोर्ट्स, अॅक्टिव्हीटी, गणवेश, बूट, वीज, स्वच्छता, पाणी आदींचा खर्च वाचला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या किंवा उत्पन्न कमी झालेल्या पालकांना पूर्ण शुल्क भरणे कठीण आहे. सध्या ताप्ती पब्लिक स्कूलकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. या विरोधात तब्बल ३०० पालकांनी मंगळवारी हुडको कॉलनीत रानातला महादेव मंदिराजवळ बैठक घेऊन हे शुल्क भरणार नसल्याचा ठाम निर्णय घेतला. 

आगामी शैक्षणिक वर्षाबाबतही घेतला निर्णय
तसेच आगामी शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू झाल्यानंतर कोणीतीही शुल्कवाढ करू नये, असे ठरविण्यात आले. दरम्यान, या सर्व मागण्यांसाठी पालकांचे शिष्टमंडळ एक, दोन दिवसांत शाळा व्यवस्थापन व संचालकांसोबत चर्चा करणार आहे. कोरोनामुळे उत्पन्न कमी झालेले पालक कोणत्याही स्थितीत शाळेची अवाजवी फी भरू शकत नाही. यामुळे शाळा शुल्कात कोणतीही सवलत न देता केवळ पुस्तकांसाठी झालेला खर्चच शुल्क म्हणून दिला जाईल, असा पवित्रा पालकांनी बैठकीत घेतला. आता या प्रकरणी ताप्ती पब्लिक स्कूलची काय भूमिका असेल? शाळा किती प्रमाणात शुल्क कमी करते याकडेही लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bhusawal tapti shcool fee recovery issue parents agressive