शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित; जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष सुरू 

देवीदास वाणी
Saturday, 16 January 2021

जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या ३० टिम स्थापन करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करीत आहे.

जळगाव : महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५८२००, २२६१८०८ असा आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी दिली. 

जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या ३० टिम स्थापन करण्यात आल्या असून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करीत आहे. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्षाचा स्थलांतरीत पक्षाशी संपर्क टाळावा. कुक्कुट पक्षात असाधारण मरतूक आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावयाचा आहे. 

चिकन शिजवूनच खावे
पूर्ण शिजवलेले चिकन व उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांना होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे बर्ड फ्ल्युबाबत नागरीकांनी भिती बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अविनाश इंगळे यांनी केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bird flu alert eggs and chikken boild