जळगावात भाजपला पुन्हा खिंडार; अस्‍मिता पाटलांचा राजीनामा

चंद्रकांत चौधरी
Friday, 25 December 2020

प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या सदस्या देखील होत्या. परंतु, त्‍यांना अचानक भाजप सोडण्याचा निर्णय घेतला.​

जळगाव : भाजपच्या बेटी बचाव बेटी पढाव आंदोलनाच्या राज्य समन्वयिका प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपला राम राम ठोकला आहे. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यात वैयक्तिक कारणांमुळे पक्षाचे सदस्यत्व सोडत असल्याचे नमूद केले आहे. खडसे यांनी भाजप सोडल्‍यानंतर अनेकजण राष्‍ट्रवादीच्या वाटेवर असल्‍याचे बोलले जात असून, यात पाच वर्षापुर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अस्‍मिता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

राष्‍ट्रवादीच्या जिल्‍हाध्यक्ष म्‍हणून काम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष जबाबदारी पार पाडली होती. पाच वर्षांपूर्वी प्रा. डॉ. पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना जिल्हा व राज्य कार्यकारणी समाविष्ट करून घेण्यात आले होते. बेटी बचाव बेटी पढाव च्या राज्य समन्वयक ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच गेल्या वेळेपासून पाचोरा विधानसभा व जळगांव लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी तयारी चालवली होती. खडसेच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे अस्मिता पाटील या पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार का? अशी चर्चा त्‍यांच्या राजीनाम्‍यामुळे रंगत आहे. 

भाजपचे विद्यमान आमदारांचीही चर्चा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर आता थेट विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार अशी चर्चा देखील होत असून या प्रवेश सोहळ्यात  भाजपमधील दोन बड्या नेत्यांचा देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bjp member resign asmita patil