भाजप आमदाराने घातले सरकारचे तेरावे; शेतकऱ्यांसमवेत सामूहिक मुंडण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 April 2021

आमदार चव्हाणांसह ३१ शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळून मंगळवारी (ता. ६) आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांची जामिनावर सुटका झाली होती. 

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारणावरून जळगावला वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात आंदोलन केल्याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण व ३१ शेतकऱ्यांची बारा दिवसांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर बुधवारी (ता. ७) श्रीक्षेत्र ऋषिपांथा (ता. चाळीसगाव) येथील गिरणा नदी किनारी आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांनी सरकारचे तेरावे घातले. या वेळी सामूहिक मुंडण करून राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. 
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीजप्रश्‍नी आमदार चव्हाणांसह उपस्थित शेतकऱ्यांनी संतप्त होऊन अधीक्षक अभियंता श्री. शेख यांना त्यांच्या खुर्चीला बांधले. या सर्व प्रकारानंतर आमदार चव्हाणांसह ३१ शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी मिळून मंगळवारी (ता. ६) आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांची जामिनावर सुटका झाली होती. 

एकत्रित येत केले सामुहिक मुंडण
सर्वांना १२ दिवस जेलमध्ये डांबून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ बुधवारी (ता. ७) आमदार चव्हाण यांच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी श्रीक्षेत्र ऋषीपांथा (बहाळ, ता. चाळीसगाव) येथील महादेव मंदिरावर एकत्र येऊन सामूहिक मुंडण केले. या वेळी शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकारचे तेरावे देखील घातले. या वेळी ब्राह्मणाच्या हस्ते तीन पाय असलेल्या खुर्चीवर ‘तिघाडी सरकार-भावपूर्ण श्रद्धांजली’ नावाच्या फोटोची विधिवत पूजा करून महाविकास आघाडीचे श्राद्ध देखील घालण्यात आले. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमदार चव्हाण यांच्यासह पंचायत समितीतील गटनेते संजय पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार चव्हाण यांचे स्वागत केले. 

आजचे मुंडण आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरुपाचे आहे. येणाऱ्या काळात शेतकरी शिंगाडे घेऊन मंत्र्यांच्या मागे लागतील, तो दिवस काही दूर नाही. तेव्हा झोपलेले सोंग घेतलेल्या सरकारने सर्वसामान्यांचा आवाज साद देऊन ऐकला तरच मार्ग निघेल. तिघाडी सरकारला ३१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या सरकारला त्यांच्या आत्म्याला जाग येऊन शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे त्यांना भान येवो. 
- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news bjp mla mangesh chavan mahavikas aaghadi