esakal | त्‍याच्या टोकाच्या पावलाने कुटूंबियांचे ‘आकाश’ फाटले; आत्‍महत्‍येपुर्वी व्हॉटस्‌ॲपवर ठेवले ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्‍टेटस्‌
sakal

बोलून बातमी शोधा

suicide case

लॉकडाउन काळात आकाश मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्यास सर्पदंश झाला होता. योग्य उपचारानंतर तो त्यातून बचावला होता. मात्र आज त्याने स्वतः आत्मघात केला.

त्‍याच्या टोकाच्या पावलाने कुटूंबियांचे ‘आकाश’ फाटले; आत्‍महत्‍येपुर्वी व्हॉटस्‌ॲपवर ठेवले ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ स्‍टेटस्‌

sakal_logo
By
शंकर भामेरे

पहूर (जळगाव) : व्हॉट्सॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेवून पहूर (ता.जामनेर) येथील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी घडली.  
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील लेलेनगर भागात राहणाऱ्या आकाश रविंद्र बावस्‍कर (वय २१) या तरुणाने राहत्या घरात छताला गळफास लावून जीवनयात्रा संपवली. गळफास घेण्यापूर्वी त्याने दुपारी सव्‍वाचारच्‍या सुमारास 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेवले आणि काही मिनिटातच त्याने घराच्या वरील मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली.

ग्रामस्‍थांनी नेले रूग्‍णालयात
घरातील लोकांनी त्याला छताला लटकलेल्या अवस्थेत पाहताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. आकाश यास खाली उतरवून पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले. परंतु ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी तपासणी अंती त्यास मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर, शिवाजी राऊत यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. 
 
तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ
आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या आकाशच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसाठी आकाशच फाटले. त्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला. मित्र परिवारामध्ये तो एक मनमिळावू स्वभावाचा मित्र म्हणून चांगलाच परिचित होता. परंतु त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई- वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत आकाश बारावीनंतर पोलीस भरती, सैन्य भरतीची तयारी करत होता. 

सर्पदंशातून वाचला पण आत्मघात झाला
लॉकडाउन काळात आकाश मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना त्यास सर्पदंश झाला होता. योग्य उपचारानंतर तो त्यातून बचावला होता. मात्र आज त्याने स्वतः आत्मघात केला.

'त्या' घटनेची झाली आठवण
आठ महिन्यांपूर्वी पहूर पेठ येथे पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाला असेच व्हॉट्सअॅपवर 'गोईंग टू द लाँग जर्नी' असे स्टेटस ठेवून जीवनयात्रा संपवली होती. आजच्या आकाशच्या हृदयद्रावक मृत्यूने 'त्या' घटनेची आठवण झाली.

संपादन ः राजेश सोनवणे