आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार : आमदार मंगेश चव्हाण

आनन शिंपी
Friday, 22 January 2021

महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे पदाधिकारी, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व पदाधिकारी उपस्थित होते.

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍नांसंदर्भात मुंबईत नुकतीच इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर हे सर्व प्रश्‍न मार्गी लागतील, असा विश्‍वास आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. 
मुंबईत झालेल्या बैठकीला आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पुसदचे आमदार इंद्रनील नाईक, इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, राज्याचे संचालक दिलीप हळदे, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संचालक संघाचे पदाधिकारी, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेश अध्यक्ष व पदाधिकारी, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी ही बैठक आयोजित करून हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी विनंती केली होती. 

विविध विषयांवर चर्चा
राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा मध्ये कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात वरिष्ठ व निवड श्रेणी मान्यतेचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना द्यावेत, वसतिगृह अधीक्षकांना आदिवासी विभागा प्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणी ४ हजार २०० रुपये द्यावी, ग्रेड पे पूर्ववत देण्याबाबत सुरु असलेली वजावट थांबवावी, थकीत वेतन देयक मंजुरीचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्तांना द्यावेत, शिक्षक कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता पूर्ववत करावा, कनिष्ठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू करावा, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचान्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आश्रमशाळा शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करावी, आश्रमशाळांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व आश्रमशाळा डिजीटल कराव्यात या मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्यांसंदर्भात मंत्रिमहोदयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्या सोडवण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon aashram school mla mangesh chavan