चोरट्यांची कमाल..एकाच रात्री बारा ठिकाणी चोऱ्या 

आनन शिंपी
Saturday, 9 January 2021

दुकानदारांनी चोरीच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त करुन पोलिसांकडून सुरक्षिततेची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनीच दुकानदारांना ‘सीसीटीव्ही’ लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा सूचना केल्या होत्या.

चाळीसगाव (जळगाव) : शहरात सध्या चोऱ्यांचे सत्र सुरुच आहे. तीन दिवसांपूर्वी तीन ठिकाणी चोरीची घटना ताजी असताना शुक्रवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास शिवाजी घाट परिसरासह गणेश रोडवरील दहा ते बारा दुकानांमध्ये चोरी झाली. या प्रकारामुळे दुकानदार भयभीत झाले आहे. शहरात चोरट्यांची उच्छाद मांडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 
शहरातील शिवाजी घाट परिसरातील शिवदर्शन कलेक्शन, बालाजी प्रोव्हीजन, विराम मसाला, मुक्तानंद फरसाण, मनुमाता प्रोव्हीजन, मुकुंदा भांडेवाले, जाम दंत आरोग्यालय, नारायण भामरे, श्रीपाद किराणा तसेच गणेश रोडवरील मंदिरासमोरील चष्म्यांचे दुकानासह इतरही काही ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली. या सर्व दुकानांमधील खाद्यपदार्थांसह गल्ल्यातील रोकड चोरट्यांनी लंपास केली. शनिवारी (ता. ९) सकाळी दुकानदार नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना कळविल्यानंतर साहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. सय्यद यांनी पाहणी करुन घडलेला प्रकार जाणून घेतला. 

वाढत्या चोऱ्यांबाबत व्यापाऱ्यांची बैठक 
दोन दिवसांपूर्वीच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख यांच्याकडे वाढत्या चोऱ्यांबाबत व्यापाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत दुकानदारांनी चोरीच्या घटनांबाबत नाराजी व्यक्त करुन पोलिसांकडून सुरक्षिततेची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर पोलिस अधिकाऱ्यांनीच दुकानदारांना ‘सीसीटीव्ही’ लावणे, सुरक्षा रक्षक नेमणे अशा सूचना केल्या होत्या. या बैठकीनंतर काल पुन्हा चोऱ्या झाल्याने दुकानदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पोलिसांचा चोरांवर कुठलाच धाक राहिलेला नसल्याने चोऱ्या सुरुच असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांतर्फे रात्रीची गस्त वाढवण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी चोऱ्या होतच असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon city one night twenty spot robbery