esakal | ऑक्‍सिजन, बेडनंतर कोरोनाबाधितांसमोर गोळ्यांची समस्‍या; रुग्णांची प्रकृती खालावतेय
sakal

बोलून बातमी शोधा

drugs tablet

ऑक्‍सिजन, बेडनंतर कोरोनाबाधितांसमोर गोळ्यांची समस्‍या; रुग्णांची प्रकृती खालावतेय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चाळीसगाव (जळगाव) : शहरातील ट्रॉमाकेअर सेंटरसह भडगाव रोडवरील अंधशाळेमधील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांना ‘फॅबिफ्लू’ गोळ्या (Fabiflu tablet) पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने बऱ्याच रुग्णांची तब्येत खालावत चालली आहे. उपचारासाठी आवश्‍यक असलेली पुरेशी औषधी नसल्याने डॉक्टरांसह कोविड केअर सेंटरमधील (Covid center) कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करताना त्रास होत आहे. दरम्यान, या गोळ्यांचा पुरवठा वरून कमी आलेला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, पुन्हा या गोळ्यांची वाढीव मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पुरेशा प्रमाणात या गोळ्या उपलब्ध होतील, असे आरोग्य विभागाच्या (Health department) अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

येथील ट्रॉमाकेअर सेंटर व अंधशाळेतील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या सर्व रुग्णांवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी औषधोपचारामध्ये ‘फॅबिफ्लू’ गोळ्या दिल्या जातात. सद्यःस्थितीत शहरातील या दोन्ही सेंटरमध्ये या गोळ्या नसल्याने नवीन संकट उभे राहिले असल्याची एक पोस्ट समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागूल यांनी व्हायरल केली. कदाचित चाळीसगावकरांना आणखीन एखादी वाईट बातमी या परिस्थितीमुळे ऐकायला येऊ शकते, असे पोस्टमध्ये नमुद करून श्री. बागूल यांनी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांना विनंती करून या गोळ्या लवकरात लवकर उपलब्ध होतील असा प्रयत्न करावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा: म्‍हणून येतोय नवापूरमध्ये कोरोनाचा आलेख खाली

ऑक्‍सिजन, बेडनंतर आता गोळ्यांची कमतरता

आतापर्यंत शहरात हॉस्पिटल उपलब्ध नव्हते, रेमडेसिव्हिर मिळत नव्हते, बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन शिल्लक नव्हते असे सर्व काही सहन केले. अनेकांनी जवळची माणसे गमावली, तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली, लहान बालके रस्त्यावर आली. अशा परिस्थितीत रुग्णांना आवश्‍यक असलेल्या ‘फॅबिफ्लू’ सध्या उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य व गोरगरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी काय करावे, असा प्रश्‍नही श्री. बागूल यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. खासगी मेडिकलमध्ये दोन हजार ७०० रुपयांना या गोळ्या सहज मिळतात. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये मिळत नाहीत. त्यामुळे संबंधितानी याची दखल घेऊन ‘फॅबिफ्लू’ गोळ्या रुग्णांसाठी तत्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी कळकळीची विनंतीही श्री. बागूल यांनी केली आहे.

वरूनच पुरवठा कमी

दरम्यान, या संदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांना विचारणा केली असता, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना ‘फॅबिफ्लू’ गोळ्या दिल्या जातात. या गोळ्यांचा सद्यःस्थितीत वरूनच पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, मागणी केल्यानंतर या गोळ्या उपलब्ध होतात. सध्याची गरज लक्षात घेऊन तशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे केली असून, पुरेशा प्रमाणात गोळ्या उपलब्ध झाल्यानंतर त्या रुग्णांना आवश्‍यकतेनुसार दिल्या जातील, असे श्री. लांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.