esakal | डॉक्‍टर असल्‍याचे भासवत उपचार; कोरोना काळातही जीवाशी खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

fraud doctor

डॉक्‍टर असल्‍याचे भासवत उपचार; कोरोना काळातही जीवाशी खेळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मेहुणबारे (जळगाव) : येथून जवळच असलेल्या शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथे तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी छापा टाकून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असून, याच महिन्यात अशा प्रकारे अवैध दवाखाना थाटणाऱ्या बंगाली डॉक्टरविरोधात कारवाई करण्यात आली होती.

चाळीसगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ. देवराम लांडे यांना शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुश्ताक सय्यद यांनी माहिती दिली होती. त्यानुसार शिरसगाव येथील शांताबाई परशुराम पाटील यांच्या राहत्या घरी, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागे माधवराव देवराम पंडित हा डॉक्टर असल्याचे भासवून ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करीत होता. माहितीच्या आधारे तालुकास्तरावर नेमण्यात आलेल्या समितीमधील सदस्य, डॉ. लांडे तसेच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, आरोग्य विस्ताराधिकारी प्रदीप सोनवणे व दोन शासकीय पंच यांच्या पथकाने छापा टाकला. त्या ठिकाणी घराच्या वरच्या मजल्यावर एका वृद्ध महिलेवर कथित डॉ. पंडित (रा. चाळीसगाव) उपचार करीत होता.

हेही वाचा: काळ नव्हता; पण वेळ खराब होती

कोरोना संसर्गातही उपचार

माधवराव पंडित हा डॉक्टर असल्याचे भासवून स्वत:च्या आर्थिक लाभासाठी कोरोना संसर्गात ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक करीत त्यांच्यावर उपचार करताना आढळून आला. या प्रकरणी तालुका आरोग्याधिकारी डॉ. लांडे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे तपास करीत आहेत.

वैद्यकीय प्रमाणपत्र नाही

पंडित याच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्राची मागणी केली असता ते नसल्याचे सांगितले. त्या ठिकाणी असलेल्या रुग्णास विचारले असता चार दिवसांपासून न्यूमोनियासदृश आजारावर उपचार करीत असल्याचे सांगितले, तर डॉक्टरच्या बॅगेची तपासणी केली असता त्यात विविध प्रकारची वैद्यकीय औषधे व साहित्य मिळून आले. त्यानुसार घटनेचा पंचनामा करण्यात आला.