esakal | काळ नव्हता; पण वेळ खराब होती
sakal

बोलून बातमी शोधा

Corona death

काळ नव्हता; पण वेळ खराब होती

sakal_logo
By
राजेश सोनवणे

पिंपळनेर (धुळे) : ‘तो’ कोरोना उपचारासाठी १७ तारखेपासून (Dhule corona update) दाखल झाला. उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाली. पुढील उपचारासाठी धुळे येथे नेण्याचा सल्ला मिळाला. अखेर तिथेच घोळ झाला अन् काळ आला नव्हता; पण वेळ खराब होती म्हणूनच कोरोनाच्या नावाखाली गरिबाचा बळी गेला. शासकीय अनास्थेमुळे घरातील कर्त्या जेजीराम नाव असलेल्या मृताच्या कुटुंबीयांना जयजय राम म्हणण्याची वेळ आली. (dhule-coronavirus-ambulance-hospital-bed-not-available-parson-death)

मंगळवारी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर (Pimpalner rural hospital dhule) येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ (Covid center) सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या जेजीराम गायकवाड (वय ५५, रा. देवळीपाडा, ता. साक्री) या रुग्णाचा धुळे येथे घेऊन जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे बळी गेला. जेजीराम हे १७ मेपासून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृती अस्वस्थतेमुळे रुग्णाला धुळे येथे हलविण्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

रूग्‍णवाहिकेचा नंबर फिरविला पण

गोरगरीब, आदिवासी सदस्यांना नेमके आपण कुठे आणि कसे जायचे, हे सर्व प्रश्न भेडसावतात. तोच प्रश्न गायकवाड यांच्या मुलालाही पडला. शेवटी त्यांनी सकाळी १०.३० वाजेपासून रुग्णवाहिका मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. रुग्णवाहिका कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हा रुग्णालयात आपल्या नावे बेड कन्फर्म आहे का? असे विचारल्यामुळे रुग्णाचा मुलगा सुनील याने कॉल कट करून स्थानिक प्रशासनाकडून बेड कन्फर्म करत कॉल सेंटरवर संपर्क साधल्यावर पुन्हा ‘तिथे कोणाशी बोलणे झाले आहे, तेथील (धुळे) डॉक्टरांचा नंबर द्या’, असे सांगितले. यामुळे त्रस्त नातेवाइक १२ वाजेपासून सेंटरच्या आवारात खासगी वाहनासाठी प्रयत्न करू लागले.

पण तोपर्यंत उशीर झाला

अशात त्यांनी भारतमाता रुग्णसेवा समितीशी संपर्क केल्यानंतर सदस्य प्रमोद गांगुर्डे यांनी तेथे पोचत धुळे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत बेड उपलब्ध केला. श्री. गांगुर्डे यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात सकाळपासून उभ्या असलेल्या रुग्णवाहिकाचालकाचा कॉल आला व ते गाडी घेऊन पुढच्या दहा मिनिटांत हजर झाले. मात्र तोपर्यंत जेजीराम गायकवाड यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना आता ऑफलाइन पद्धतीने

शासकीय अनास्थेमुळे वाढतोय संभ्रम

१०८ रुग्णवाहिका व स्थानिक ग्रामीण रुग्णालयाची १०२ रुग्णवाहिका या दोन्ही रुग्णालय आवारात उभ्या असताना, प्रत्येक ठिकाणी पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध असताना फक्त सरकारी गोंधळामुळे जेजीराम गायकवाडसारख्या घरातील कर्त्या पुरुषाचा नाहक बळी गेला. मृताच्या मुलांचा व नातेवाइकांचा आक्रोश पाहता, हा बळी कोविडचा की प्रशासनातील अनास्थेचा? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो. अखेर कुटुंबातील सदस्यांच्या आक्रोशात मृत जेजीराम गायकवाड यांच्यावर दुपारी चारला पिंपळनेर स्मशानभूमीत भारतमाता रुग्णसेवा समितीच्या स्वयंसेवकांनी नातेवाइकांसह अंत्यसंस्कार केले.

आज असे अनुभव अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना वेळोवेळी येत आहेत. या निमित्ताने पुन्हा कोणी जेजीराम गायकवाड होऊ नये, असे जर धुळे जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना वाटत असेल तर तातडीने सिस्टिममधील बेड कन्फर्मेशनच्या नावाखाली सुरू असलेला गोंधळ थांबवावा. अशिक्षित आदिवासी व सर्वसामान्य गोरगरीब माणसांना न्याय मिळवून द्यावा.

-प्रमोद गांगुर्डे, सदस्य, ग्रामपंचायत-पिंपळनेर