चारचाकी घ्‍यायचीय म्‍हणून पाच लाख आणण्यासाठी विवाहीतेचा छळ

दीपक कच्छवा
Tuesday, 2 March 2021

सासरच्या लोकांकडून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या सततच्या छळाला कंटाळून या विवाहीतेने मेहूणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मेहुणबारे (जळगाव) : चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून 5 लाख रूपये आणले नाही या कारणावरून विवाहीतेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी भडगाव येथील सहा जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या वीस वर्षीय विवाहीतेचा भडगाव, इंदिरानगर भागातील रहिवासी मयुर प्रविण पाटील याचेशी विवाह झाला होता. विवाहानंतर 15 जुन 2020 पासून ते आजपावेतो वेळोवेळी भडगाव, चाळीसगाव व खेडगाव येथे माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी पाच लाख रूपये आणावेत; म्हणून सासरच्या लोकांकडून शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला. या सततच्या छळाला कंटाळून या विवाहीतेने मेहूणबारे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी विवाहीतेच्या तक्रारीवरून पती मयुर प्रविण पाटील, सासरा प्रविण दयाराम पाटील, सासु अरूणा प्रविण पाटील, नंदोई राजेंद्र वाल्मीक पाटील, नंदोई निलम राजेंद्र पाटील (सर्व रा. इंदिरानगर, बाळदरोड भडगाव) व गंगाराम काशिराम पाटील (रा. चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोना प्रताप मथुरे करीत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon crime news women torture in five lakh