esakal | चाळीसगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर रडारवर

बोलून बातमी शोधा

fraud doctor

चाळीसगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर रडारवर

sakal_logo
By
टिम इ सकाळ

चाळीसगाव (जळगाव) : तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही अधिकृत परवाना नसताना दवाखाने थाटलेल्या बोगस डॉक्टरांवर येथील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. तालुक्यातील अंधारी- हातगाव रस्त्यावरील एका शेतात अवैधरित्या दवाखाना थाटणाऱ्या एका बोगस बंगाली डॉक्टरच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्याच बोगस डॉक्टरांनी आपली दवाखाने थाटली आहेत. या डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवीचे कुठलेही अधिकृत सर्टिफिकेट नाही किंवा वैद्यकीय सेवेचा परवाना देखील नाही. यातील काही जणांनी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या बनावट पदव्यांचे सर्टिफिकेट आपल्या दवाखान्यात लावले आहे. ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या आजाराचे रुग्ण या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. यात बऱ्याच जणांना या डॉक्टरांचा गुणही येतो. हे खरे असले तरी या डॉक्टरांकडून केले जाणारे उपचार नियमबाह्य असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, यात सातत्य न ठेवल्यामुळे बोगस डॉक्टरांची संख्या कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसून येत आहे. अंधारी (ता. चाळीसगाव) परिसरात तर चक्क कंपाऊंडर असलेल्या एकाने स्वतःला डॉक्टर असल्याचे खोटे भासवून दवाखाना थाटला आहे.

अंधारीत कारवाई

अंधारी (ता. चाळीसगाव) परिसरात सुमारे दहा वर्षांहून अधिक काळापासून एक बंगाली डॉक्टर सेवा देत आहे. प्राप्त माहितीनुसार, या डॉक्टरवर परिसरातील रुग्णांची प्रचंड श्रद्धा देखील आहे. याच भागातील तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांना हातगाव- अंधारी रस्त्यावरील शेतात बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती दिली. त्यानुसार, डॉ. लांडे यांनी सकाळी दहाच्या सुमारास अचानक जाऊन छापा मारला असता, दोन रुग्ण दवाखान्यात सलाईन लावलेले व इतर काही रूग्ण दवाखान्यात उपस्थित असल्याचे दिसून आले. संबंधित डॉक्टरकडे पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र मागितले असता, त्याने ते दिले नाही व तेथून पळ काढला. त्यामुळे संबंधित बोगस डॉक्टर बंगालीच्या विरोधात डॉ. लांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र वैद्यक व्यावसायिक अधिनियम १९६१ अंतर्गत कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार भालचंद्र पाटील करीत आहेत.

रुग्णांच्या जीवाशी कोणीही खेळ करु नये, बोगस डॉक्टरांबाबत कोणालाही काही माहिती असल्यास, त्यांनी आम्हाला कळवावी. चौकशी करुन दोषी बोगस डॉक्टरांच्या विरोधात कायद्यानुसार गुन्हा दाखल करु. आमची बोगस डॉक्टरांची शोध मोहीम यापुढेही सुरुच राहणार आहे.

- डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव