esakal | पालिकेच्या पाण्याचा खासगी वापर 

बोलून बातमी शोधा

chalisgaon palika water supply}

शहरवासीयांना पाण्याची टंचाई भासू नये तसेच बाराही महिने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या माध्यमातून पालिकेने गिरणा उद्भव योजनेतून थेट गिरणा धरणातून जलवाहिनी टाकलेली आहे.

jalgaon
पालिकेच्या पाण्याचा खासगी वापर 
sakal_logo
By
आनन शिंपी

चाळीसगाव (जळगाव) : थेट गिरणा धरणावरुन शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपालिकेच्या जलवाहिनीवरुन पाण्याची सर्रास चोरी होत आहे. चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील काही हॉटेलचालकांसह शेतकऱ्यांकडून हे पाणी वापरले जात आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार पालिकेच्याच कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाच्या मालकीच्या मिनरल वॉटर प्लॉन्टसाठी देखील पालिकेचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. याबाबत पालिका प्रशासनाने पाणी चोरी करणाऱ्यांना नोटीसा बजावल्या असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सांगितले. 
शहरवासीयांना पाण्याची टंचाई भासू नये तसेच बाराही महिने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी तत्कालीन आमदार राजीव देशमुख यांच्या माध्यमातून पालिकेने गिरणा उद्भव योजनेतून थेट गिरणा धरणातून जलवाहिनी टाकलेली आहे. या जलवाहिनीला छिद्रे पाडून तर काही वेळा व्हॉल्व्हवरुन पाण्याची सर्रास चोरी केली जाते. ही जलवाहिनी पालिकेच्या मालकीची असून तिच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही पालिका करते. असे असताना चाळीसगाव- मालेगाव रस्त्यावरील काही हॉटेलचालक तसेच काही सधन शेतकरी सर्रास या पाण्याची चोरी करतात. या पाणी चोरीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत होता. 

वारंवार तंबी तरीही
पालिकेकडून वारंवार तंबी देऊनही पाणी चोरी अद्यापपर्यंत पूर्णपणे थांबलेली नाही. टाकळी प्र. दे. (ता. चाळीसगाव) गावाजवळ एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या मालकीचा मिनरल वॉटर प्लॉन्टला देखील हेच पाणी वापरले जात असल्याचे पालिकेच्या पथकाला आढळून आले. कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी कोणाचीही गय करु नका, पाण्याची चोरी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा असे सांगितले. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत मेहुणबारे पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

गुन्हा दाखल होणार 
या संदर्भात पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी पाणी चोरी होत असल्याने ती रोखण्यासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल होणे आवश्‍यक आहे असे सांगितले. या पाणी चोरीमुळेच शहरवासीयांना पाणीपुरवठा करताना अनियमितता येते, त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या जलवाहिनीवरुन पाणी चोरी रोखणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार दिलेली असून पाणी चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होईलच असे त्यांनी सांगितले. 
 
पालिकेच्या जलवाहिनीवरुन पाणी चोरी करणाऱ्यांना आम्ही रितसर नोटीसा बजावल्या आहेत. अजून कुठे पाण्याची चोरी होत असेल तर त्याचाही शोध आमचे कर्मचारी घेत आहेत. यात जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. 
- आशालता चव्हाण, नगराध्यक्षा ः चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे