
न्यायालयात पोलिसांनी आरोपीची पोलिस कोठडीची मागणी न करता न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर काही तासातच आवश्यक ते सर्व सोपस्कार पार पाडून आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
चाळीसगाव (जळगाव) : बोढरे (ता. चाळीसगाव) येथील सोलर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची विक्री झाल्याच्या एका प्रकरणात ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या जामिनासाठी संपूर्ण यंत्रणाच सरसावल्याचे शुक्रवारी (ता. ८) दिसून आले. न्यायालयात पोलिसांनी आरोपीची पोलिस कोठडीची मागणी न करता न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर काही तासातच आवश्यक ते सर्व सोपस्कार पार पाडून आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांच्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
बोढरे (ता. चाळीसगाव) गट क्रमांक ६९-१ शेत सात एकर जमीन येथील ॲड. केदार चावरे यांनी मूळ मालक कुलकर्णी यांच्याकडून खरेदी करण्याबाबत १७ सप्टेंबर २०१९ ला सौदा पावतीचा व्यवहार केला. त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली त्या वेळी या जमिनीचा उतारा काढल्यानंतर त्यावर ही शेतजमीन जेबीएम सोलर पावर महाराष्ट्र प्रायव्हेट लिमीटेड, नवी दिल्लीतर्फे कुशाग्र अग्रवाल यांच्या मालकीची असल्याचे आढळून आले. हा प्रकार पाहून ॲड. चावरे आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर त्यांनी या शेतजमिनीच्या खरेदीखताची नक्कल मिळवली असता, त्यावर कुलकर्णी कुटुंबातील व्यक्तींच्या जागी अनोळखी व्यक्तींची छायाचित्रे दिसून आली. अधिक तपास केल्यानंतर त्यावरील आधारकार्डचे क्रमांकही वेगवेगळे दिसून आले. या बनावट खरेदीखतावर ओळख देणारे साक्षीदार म्हणून यशप्रिय देवप्रिय आर्य हे कंपनीचे हस्तक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ही शेतजमीन खरेदी प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे ॲड. चावरे यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी सुरवातीला येथील पोलिस ठाण्यात रितसर तक्रार केली. मात्र, पोलिसांनी ही तक्रार नोंदवली नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार, ८ सप्टेंबर २०२० ला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेनंतर सुटका
या प्रकरणाचा तपास येथील पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक किरण दांडगे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी गुरुवारी (ता. ७) रात्री अकराला मुंबई येथून यशप्रिय आर्य यांना अटक केली. आर्य हे जेबीएम ऑटो कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर आहेत. अटक केल्यानंतर शुक्रवारी आर्य यांना पोलिसांनी येथील न्यायालयात हजर केल्यानंतर या गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी न्यायालयाकडे पोलिस कोठडीची मागणी करण्याऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने यशप्रिय आर्य यांना न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका व्हावी म्हणून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालयातून लगचेच ‘सॉल्व्हन्सी’चे काम पूर्ण करण्यात आले. सर्व ती आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर यशप्रिय आर्य यांची लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली. संशयित आरोपी यशप्रिय आर्य यांना मिळालेल्या जामिनावर ॲड. चावरे यांनी हरकत अर्ज दिला आहे.
या प्रकरणात तपासासाठी संबंधित संशयित आरोपीची पोलिस कोठडीची गरज वाटली नाही, गुन्ह्यातील कलमांतर्गत आम्हाला जी माहिती आवश्यक होती ती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस कोठडी मागितली नाही.
- किरण दांडगे, पोलिस उपनिरीक्षक, चाळीसगाव पोलिस ठाणे
संपादन ः राजेश सोनवणे