शिट्या वाजवत स्‍टंटबाजी करत रस्त्यांवर रोडरोमिओ ‘अनलॉक’ 

आनन शिंपी
Saturday, 16 January 2021

एखाद्या विद्यार्थिनीच्या बाबतीत छेडखानीचा प्रकार घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने बऱ्याचदा तक्रार केली जात नाही. त्यामुळे टवाळखोरांचे चांगलेच फावते.

चाळीसगाव (जळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन’ करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालये बंद होती. त्यामुळे रोडरोमिओ ‘लॉक’ झाले होते. मात्र, शहरातील खासगी क्लासेससह महाविद्यालय, तसेच शाळांमध्ये नववी, दहावीचे वर्ग सुरू झाल्याने रस्त्यांवर रोडरोमिओ ‘अनलॉक’ झाल्याने टवाळखोरांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. विशेषतः शाळा, महाविद्यालयांच्या आवारात टवाळखोरांची टोळकी पूर्वीसारखे दिसू लागली आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांचे निर्भया पथक गायब झाल्याने टवाळखोरांचा उपद्रव विद्यार्थिनींसाठी त्रासदायक ठरत आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजू लागली आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाच्या आहारी तरुण पिढी गेल्याने मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्रास होत असतात. एखाद्या विद्यार्थिनीच्या बाबतीत छेडखानीचा प्रकार घडल्यानंतर बदनामीच्या भीतीने बऱ्याचदा तक्रार केली जात नाही. त्यामुळे टवाळखोरांचे चांगलेच फावते. शहरातील आनंदीबाई बंकट हायस्कूल, राष्ट्रीय महाविद्यालय, धुळे रोडवरील चाळीसगाव महाविद्यालयासह इतर काही शाळा व खासगी क्लासेसच्या आवारात बऱ्याचदा टवाळखोर टोळक्याने उभे असतात. 

शिट्या वाजवत स्‍टंटबाजी
मोबाईलवरून मुलींचे फोटो काढणे, शिटी वाजविणे, मुलींसमोरून भरधाव वेगाने वाहन चालविणे, त्यावर स्टंटबाजी करणे यांसारखे प्रकार करतात. मध्यंतरी हे प्रकार वाढल्यानंतर त्याबाबतीत तक्रारीदेखील वाढल्याने बहुतांश शाळा, महाविद्यालयांमध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश बंद करून सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शाळा किंवा महाविद्यालयात सुरक्षित वातावरण असले तरी बाहेर मात्र मुलींच्या बाबतीत असुरक्षिता असल्याने पालकही धास्तावलेले असतात. 

निर्भया पथक गायब 
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचे निर्भया पथक आतापर्यंत कार्यरत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हे पथकच गायब झाले आहे. मुळात येथील पोलिस ठाण्यात पुरेशा महिला पोलिस कर्मचारी नाहीत. निर्भया पथकाकडून यापूर्वी टवाळखोरांवर कारवाया केल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थिनींचे छेड काढण्याच्या प्रकाराला आळा बसला होता. हे पथक सध्या नियुक्त नसल्याचे येथील पोलिसांकडून सांगण्यात आले. शहरात तरुणाईची वर्दळ असलेल्या लक्ष्मीनगर, नारायणवाडी, हिरापूर रोड, स्टेशन रोड, धुळे रोड, बसस्थानक परिसर आदी भागातही टवाळखोरांचा वावर सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन अधूनमधून शाळा, महाविद्यालयांच्या आवारात साध्या वेशातील पोलिसांना पाठवून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 
 
विद्यार्थिनींची छेडखानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा प्रकार कुठे घडत असेल तर थेट आम्हाला कळवावे, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवून टवाळखोरांवर योग्य ती कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करू. 

- विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक, चाळीसगाव 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chalisgaon raodromeo on the streets in school open