esakal | पोलिस बनून आला अन्‌ घातली हुज्‍जत; अखेर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

chalisgaon lockdown
पोलिस बनून आला अन्‌ घातली हुज्‍जत; अखेर गुन्हा दाखल
sakal_logo
By
टिम इ सकाळ

चाळीसगाव (जळगाव) : येथील किराणा दुकानदारांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करणाऱ्या झीरो पोलिसाच्या विरोधात किराणा दुकानदारांच्या मागणीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे किराणा असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला असून, शुक्रवार (३० एप्रिल)पासून सकाळी सात ते अकरा या वेळेत नेहमीप्रमाणे किराणा दुकाने सुरू राहतील, असे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

येथील पालिकेसह पोलिसांतर्फे सध्या लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. कारवाई करताना पथकात सहभागी झालेल्या झीरो पोलिसांकडून एका दुकानदाराला शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २८) घडला. त्यामुळे संतप्त झालेल्या किराणा व्यावसायिकांनी किराणा दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गुरुवारी शहरातील सर्व किराणा व्यावसायिकांची दुकाने बंद होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील गुरुवारी सकाळी शहरात फिरून किराणा दुकानदारांना बंदचे आवाहन केले. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत किराणा दुकाने १०० टक्के बंद होती.

निवेदनाची दखल

प्रशासनाच्या नावाने खंडणी व बोगस पावत्या फाडणाऱ्या तोतया अमिनोद्दीन शेखवर उचित कारवाई करण्यासंदर्भात खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आदींना निवेदन दिले. त्याची दखल घेत, गुरुवारी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्ष शांताराम नेरकर, सचिव श्यामकांत शिरुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. पालिकेतर्फे दुकानदारांना देण्यात आलेल्या पावत्यांवर ‘त्या’ झीरो पोलिसाची स्वाक्षरी असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. जे दुकानदार नियमांचे पालन करतात, त्यांनाही विनाकारण त्रास दिला जात असल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले. घडलेल्या प्रकारातील सत्यता जाणून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित झीरो पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले.

अदखलपात्र गुन्हा दाखल

या प्रकरणी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांत संशयित अमिनोद्दीन शेख मोयोद्दीन (रा. इस्लामपुरा, चाळीसगाव) याच्याविरोधात त्याचा काहीएक संबंध नसताना किराणा दुकानदारांशी अरेरावी करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे किराणा दुकानदारांमधून कौतुक होत आहे.

सर्व व्यापारी बांधवांनी बेमुदत दुकाने बंदचा जो निर्णय घेतला होता, तो प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे मागे घेत आहोत. त्यामुळे उद्या (ता. ३०)पासून आपापली दुकाने सुरळीत सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू करावीत.

-जितेंद्र देशमुख, अध्यक्ष, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, चाळीसगाव