एक विवाह सासरच्या मंडळींकडचा..रिनाची नव आयुष्‍याला सुरवात

सुनील पाटील
Tuesday, 29 December 2020

विवाह म्‍हणजे दोन जणांच्या नवजीवनाची सुरवात. पण अगदी तारूण्यात विधवा होणे इतके मोठे दुर्देव एका मुलीसाठी वाईटच आहे. कारण संपुर्ण आयुष्‍य जगणे कठीण आहे. पण विधवा सुन आयुष्‍य कसे जगणार या विचारातून सासरच्या मंडळींनीच सुनेचा विवाह लावून देत तिच्यास नवीन आयुष्‍याची सुरवात करून दिली.

चोपडा (जळगाव) : विधवा, विधुर, घटस्फोटित आशयाचे पुनर्विवाह व्हावे; अशी सर्वांची इच्छा असते. परंतु पुढाकार कोणी घेत नाही. आजची सामाजिक परिस्थिती बिकट झाली आहे. मुळात मुलीचे प्रमाण कमी असल्‍याने चांगल्या वधुसाठी चांगला वर मिळणे कठीण झाले आहे. तर चांगल्या वरासाठी उत्तम वधू मिळणे फारच कठीण. अशा परिस्थितीत जो तडजोड करेल त्याचेच विवाह जुळतील असं अलिखित नियम होऊन गेला आहे; असाच एक आदर्श विवाह चोपडा शहरात पाहायला मिळाला. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी सुनेचा विवाह लावून दिला.

रिनाची लागली चिंता
विरवाडे (ता. चोपडा) येथील व चोपडा शहरातील (कै.) सचिन हरकचंद सुराणा यांचे तीन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याची धर्मपत्नी रिना नेमीचंद जैन हिचे घोडगाव (ता. चोपडा) येथील माहेर. पतीच्या निधनाने कमी वयात ती विधवा झाली. आता संपुर्ण आयुष्य कसे निघणार? या विवंचनेत सासर व माहेरची मंडळी होती. रिनाची सासू लिलाबाई सुराणा या देखील अगदी कमी वयातच विधवा झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जीवन जगताना पती नसताना काय त्रास करावा लागतो याची जाणीव लिलाबाई होती. त्यामुळे चांगला मुलगा मिळाला; तर सुनेचे दुसरे लग्न लावून देईल या विचारात त्‍या होत्‍या. मनातील इच्छा त्यांनी त्याचे जेठ ताराचंद सुराणा, मोठा मुलगा संदीप, भाऊ जवरीलाल कटारिया यांना सांगून सुनेसाठी मुलगा शोधण्याचे काम केले.

मुलीप्रमाणे लावला विवाह
वर मुलाचा शोध घेत असताना मोहाडी (जि. धुळे) येथील (कै.) लखीचंद नेमीचंद छाजेड यांचा मुलगा पुनमचंद छाजेड यास पसंत केले. त्या मुलाला देखील रिना पसंतीस आली. यानंतर विवाहाची तारीख निश्‍चित करून 27 डिसेंबरला दुपारी एकला आदेश बरडीया यांनी जैन पध्दतीने हे लग्न लावले. सासुनेच मुलगी समजून सुनेचा पुनर्विवाह करून दिल्याने उपस्थित मंडळी विशेष कौतुक करत होते. या सोहळ्यास माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, चोपडा पिपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, संचालक नेमीचंद कोचर, संघपती गुलाबचंद देसरडा आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news chopda jain family widow again marriage