esakal | जिल्हा रुग्णालय झाले ‘सामान्य’
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon civil hospital

कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून ५ एप्रिल २०२० पासून घोषित झाले होते.

जिल्हा रुग्णालय झाले ‘सामान्य’

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या नॉन कोविड सुविधेला गुरुवार (ता. १७)पासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या तपासण्या व उपचारासाठी १३३ रुग्णांनी नॉन कोविड सुविधेचा लाभ घेतला. 
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड सुविधा सुरू करण्यासंबंधी घोषणा केली होती. त्यानुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजून ३० मिनिटांनी निंभोरा (ता. रावेर) येथील रत्‍नाबाई भिल (वय ४०) यांना पहिला केसपेपर देऊन ‘ओपीडी’ सुरू करण्यात आली. 
या वेळी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर. यू. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. संजय बनसोडे उपस्थित होते. 

विभागांची पाहणी 
सकाळी सुमारे दीड तास सर्व विभागांची तपासणी करून अधिष्ठाता, उपअधिष्ठाता व अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. या वेळी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. रुग्णांशीदेखील संवाद साधला. 

कोविड हॉस्पिटलनंतर... 
कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून ५ एप्रिल २०२० पासून घोषित झाले होते. तेव्हापासून नॉन कोविड सुविधा डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाकडे वर्ग केली होती. 

सर्व प्रकारच्या रुग्णांची हजेरी 
दिवसभरात स्त्रीरोग, बालरोग, अपघात, विषप्राशन, दुखापती, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, नाक-कान-घसा, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, दंतचिकित्सा, किडनी आजार, प्राण्यांचे चावे, सोनोग्राफी, अस्थिविकार, मलेरिया, डेंगी, फुफ्फुस संबंधित, मणका-सांध्यांचे आजार याबाबत उपचार घेण्यासाठी रुग्ण दवाखान्यात आले. 

प्रयोगशाळाही सज्ज 
रक्त, लघवी तपासणी विभागदेखील अद्ययावत झाला असून, अहवाल तातडीने १५ मिनिटांच्या आत प्राप्त होत आहे. सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ पुरुष व ५४ महिला अशा १३३ रुग्णांनी ओपीडीतील वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला. 

रुग्णांमध्ये समाधान 
उपचार घेण्यासाठी शहरात मध्यवर्ती जागेत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे गुरुवारी सकाळपासून उपचारासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक आले होते. यातील काही जणांनी तर ‘देव पावला’ अशी बोलकी प्रतिक्रिया देत रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त केले. 
 
नऊ महिन्यांपासून कोविड हॉस्पिटल झालेल्या जिल्हा रुग्णालयात आजपासून नॉन कोविड सेवा सुरू झाली. त्यासंबंधी सर्व वैद्यकीय अधिकारी, स्टाफही रुजू झाला असून, सर्व सुविधा कार्यान्वित झाल्या आहेत. 
-डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image