
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हाभरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ओपीडीची वेळ असते.
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाहन पार्किंगला शिस्त लागावी म्हणून रुग्णालयाच्या प्रांगणात उभ्या केलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या हवा सोडण्याचा प्रयोग आज वाहतूक शाखेच्या मदतीने करण्यात आला. यामुळे रुग्णालयात बेशिस्पतपणे वाहन लावणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. अनेक वेळा सांगूनही वाहनधारक बेशिस्त पार्कीग करीत होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हाभरातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत ओपीडीची वेळ असते. दिवसभरात आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी देखील रुग्णांची ये-जा सुरू असते. त्याचबरोबर रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिका तसेच रुग्ण घेऊन येणारी वाहने यासह संशयित आरोपी घेऊन येणाऱ्या पोलिसांच्या वाहनांना मुख्य गेट क्रमांक १ मधून प्रवेश दिला जात आहे. असे असताना देखील काही वाहनधारक हे रुग्णालयाच्या आवारामध्ये सुरक्षारक्षकांना न जुमानता वाहने लावीत आहेत, असे निदर्शनास आले आहे.
हवा सोडली
महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस महापालिकेने भुयारी गटारीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गेट नंबर २ हे महापालिकेच्या कामामुळे तात्पुरते बंद आहे. त्यासाठी वाहनांना ये-जा करण्यासाठी मुख्य गेट क्रमांक १ मधून तात्पुरता प्रवेश दिला जात आहे. तेथून वाहन थेट पार्किंगच्या दिशेने नेऊन वाहन तळाला पार्किंग करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक वाहनधारक हे त्यांचे वाहन रुग्णालयाच्या आवारामध्येच पार्किंग करीत आहेत. सुरक्षारक्षकांनी सूचना केल्यावर देखील वाहन चालक उर्मटपणे वागत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव बेशिस्त वाहनधारकांच्या वाहनांची हवा सोडावी लागत आहे. यात दिवसभरात ४५ वाहनांची हवा सोडण्यात आली. यापुढे पोलिस दलाच्या वाहतूक शाखेची मदत घेऊन वाहनधारकांना शिस्त शिकविण्यात येणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे