
विमानतळावरून येणाऱ्यांना १४ विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश आहे.जिल्ह्यात नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे.
जळगाव :: जळगाव शहर महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंतची संचारबंदी आजपासून लागू करण्यात आली आहे. संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ५ नियम मोडणाऱ्यांना दंड व शिक्षा दोन्ही करण्यात येतील, ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत सुरू राहील.अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ३१ डिसेंबरला मात्र रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत जळगाव महापालिका क्षेत्रासह सर्व जिल्ह्यात (नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामीण) संचारबंदी लागू असेल.
महापालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यावेळी उपस्थित होते. ब्रिटनमध्ये नवीन कोरोना विषाणू आढळला असून त्याची दक्षता म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी जाहीर केली. विमानतळावरून येणाऱ्यांना १४ विलगीकरणात ठेवण्याचे सक्त आदेश आहे.जिल्ह्यात नवीन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे.
रस्ते राहणार निर्मनुष्य
महापालिका क्षेत्रात सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची अंमलबजावणी कडक होईल. पेालिस फ्लांईग स्क्वाट रात्रभर फिरत असतील. अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना अटकाव केला जाईल. ठिकठिक़ाणी पोलिसांची डयूटी लावली जाईल. संचारबंदी कोणालाच फिरता येणार नाही.
कामगारांची वेळ बदला
एमआयडीसी किंवा इतर ठिकाणी रात्रपाळी करणाऱ्या कामगारांना एकतर रात्री अकरा्च्या अगोदर कामावर बोलवा, त्यांना अकराच्या अगोदर घरी जावू द्या. अशा सूचना सर्व एमआयडीसीतील उद्योजकांना देण्यात आल्या आहेत; जेणे करून त्यांना रात्री अकरानंतर घरी जाताना किंवा परत येताना अडचणी येणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१४ हजार बेडची सज्जता
कोरोनाची दुसरी लाट आली तरी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. १४ हजार ५०० बेड कोरोना बाधीतांसाठी तयार आहेत. त्यांच्यावर तातडीचे उपचार केले जातील. कोरोनाची लस जानेवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यास प्राप्त होणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे