esakal | औषध विक्रेताकडे ३२ रेमडेसिव्हिरचा साठा; चार इंजेक्शन बेहिशेबी

बोलून बातमी शोधा

remdisivor

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. ११) तीन औषधी दुकानांची तपासणी केली. पहिला छापा मैक्स मेडिकलमध्ये टाकण्यात आला.

औषध विक्रेताकडे ३२ रेमडेसिव्हिरचा साठा; चार इंजेक्शन बेहिशेबी

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : शहरासह जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी आवश्‍यक असलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची टंचाई निर्माण झाली आहे. या इंजेक्शनचा अवैधरीत्या कोणी साठा केला आहे काय, याची तपासणी विविध पथकांद्वारे औषध विक्रेत्यांकडे जाऊन केली जात आहे. रविवारी ३२ रेमडेसिव्हिरचा साठा जळगावच्या एका मेडिकलमध्ये आढळून आला, तर चार इंजेक्शन बेहिशेबी असल्याचे दिसून आले. दोन दिवसांत तब्बल ३६२ रेमडेसिव्हिर व चार इंजेक्शनचा साठा मिळून आला आहे. 
रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार शहरासह जिल्ह्यात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी (ता. ११) तीन औषधी दुकानांची तपासणी केली. पहिला छापा मैक्स मेडिकलमध्ये टाकण्यात आला. त्यात रेमडेसिव्हिरचा साठा निरंक होता. या मेडिकलमध्ये नोंदवही नाही, गुगल सीट अपडेट केले नसल्याचे दिसून आले. फक्त १८ रुग्णांचा एचआरसीटी रिपोर्ट आढळून आला, तर इतर रुग्णांची कागदपत्रे मिळाली नाहीत. दुसरा छापा बजरंग बोगद्याजवळील रिवा मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्सवर टाकण्यात आला. त्यात रेमडेसिव्हिरची पाच इंजेक्शनची खरेदी व विक्री झाल्याचे दिसून आले. येथेही मेडिकलमध्ये नोंदवही नाही, गुगल सीट अपडेट केले नसल्याचे दिसून आले. तिसरा छापा मातोश्री मेडिकल, मातोश्री कोविड केअर सेंटरवर टाकण्यात आला. यात ३२ इंजेक्शनचा साठा आढळला. शिल्लक साठा २८चा असताना चार इंजेक्शन जास्तीचे आढळून आले. येथेही मेडिकलमध्ये नोंदवही नाही, गुगल सीट अपडेट केलेले नव्‍हते. ठरवून दिलेल्या किमतीच्या वर शंभर रुपये जादा घेऊन दिल्याचे दिसून आले. 

३६ तासांत सहा ठिकाणी छापे 
आज गणपती हॉस्पिटल, ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, अनन्य मेडिकलमध्ये छापा टाकला होता. त्यात साठा निरंक आढळला. कालपर्यंत एकूण सहा ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. काल शहरात ऑर्किड हॉस्पिटल व पवन मेडिकलची तपासणी करण्यात आली. त्यात अवैधरीत्या साठा आढळून आला नाही. जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार नामदेव पाटील, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक आबासाहेब रासकर अशा चार जणांचे पथक नियुक्त केले आहे. पुरवठा विभागाचे के. आर. तडवी, पी. पी. पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांनी छापे टाकले. 

दोन दिवसांत ३६६ बेहिशेबी रेमडेसिव्हिर 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दोन दिवसांत ३३० बेहिशेबी रेमडेसिव्हिर आढळून आले. जळगाव येथील सुपर स्टॉकिस्ट पलोड एजन्सी, श्याम डिस्ट्रिब्यूटर्स व रुबी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली. प्राप्त इंजेक्शन व वितरित इंजेक्शनचा हिशेब तपासला. पलोड एजन्सीकडे दहा इंजेक्शन अतिरिक्त आढळली. तसचे चाळीसगाव येथील स्टॉकिस्टकडे अतिरिक्त इंजेक्शन असल्याची माहिती मिळाल्याने तेथे तपासणी करण्यात आली असता ३२० इंजेक्शन जादा आढळली होती. 

संपादन- राजेश सोनवणे