
सरणापेक्षा मरण स्वस्त..चोपड्यात अंत्यसंस्कारासाठी सरण मिळेना
चोपडा (जळगाव) : शहरातील पालिकेच्या कस्तुरबा शाळेमागील स्मशानभूमीत सोमवारी (ता. २६) सहा मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते; परंतु त्यांना जाळण्यासाठी जागा मिळत नव्हती, तर ज्यांना अंत्यविधीसाठी जागा मिळाली, त्यांना मृतदेह जाळण्यासाठी सरण मिळत नव्हते, जे मृतदेह जाळले होते, तेदेखील सरणाअभावी अर्धवट जळत होते. तेव्हा चोपड्यात सरणापेक्षा मरण स्वस्त झाले असून, चोपडा पालिकेचे सत्ताधारी हे माणसाच्या मृत्यूनंतरदेखील त्यांचे सरणासाठी हाल करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी केला.
शहरात सोमवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास सहा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक पालिकेच्या स्मशानभूमीत घेऊन आले होते. त्या ठिकाणी नगरसेवक तथा गटनेते महेश पवार यांचे चुलत काका यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी पालिकेच्या स्मशानभूमीत गेले असता तेथे अत्यंत विदारक चित्र दिसून आल्याचे सेनेचे शहराध्यक्ष आबा देशमुख यांनी सांगितले. या वेळी मृतदेह जाळण्यासाठी नातेवाइकांना सरण मिळत नाही. त्यासाठी त्यांना वाट पाहावी लागत आहे आणि जे मृतदेह आधी जळत होते, तेदेखील सरणाअभावी अर्धवट जळत असल्याचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य दिसले. या वेळी तेथील पालिकेचे कर्मचारी किशोर पवार यांना सरणाविषयी विचारले असता लाकडाचा पुरवठा कमी असून, याविषयीची माहिती वरिष्ठांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सरणापेक्षा मरण स्वस्त
एकीकडे महाराष्ट्रात ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर याची कमतरता असल्याचे ऐकत आहे. परंतु चोपड्यात मृत व्यक्तीला जळायला सरणदेखील मिळत नसेल तर सरणापेक्षा मरण स्वस्त झाल्याची परिस्थिती चोपड्यात निर्माण झाली आहे. कोरोनाच्या काळात शहरासह ग्रामीण भागातील अनेक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, आधीच नागरिक हैराण झाले आहेत. त्यात मृतदेहाला सरणही मिळत नसेल तर नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी पक्ष जर अंत्यविधीसाठी पुरेसे सरण पुरवू शकत नसेल तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. या घटनेला सर्वस्वी पालिका प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
कालपर्यंत स्मशानभूमीत बारीक लाकडे नव्हती; परंतु जाड लाकडे होती. साडेअकराला लगेच बारीक लाकडांचे ट्रॅक्टर आले. नातेवाईक जाड लाकडे न वापरता बारीक लाकूड वापरतात. म्हणून ते संपले. रविवार असल्याने सोमवारी लाकडे पोचण्यास उशीर झाला.
- नीलेश ठाकूर, कार्यालयीन निरीक्षक, पालिका, चोपडा
स्मशानभूमीत आजचा प्रकार पाहून अंतःकरण जळून गेले आहे. चोपडा पालिकेचा कारभार पाहून लाज वाटते. थोडीशी तरी मदत करण्याची दानत ठेवा, लाज वाटत असेल तर नियोजन करावे. मृतदेह जाळायला सरण मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी शोकांतिका आहे. थोडीफार तरी सत्ताधाऱ्यांना लाज असेल तर खुर्च्या सोडा. नाहीतर मृतदेहांची अवहेलना थांबवा. शेवटच्या अंत्यसंस्कारासाठी तरी सरण उपलब्ध करून द्या हो..!
- आबा देशमुख, शहराध्यक्ष, शिवसेना, चोपडा
Web Title: Marathi Jalgaon News Corona Death Funeral No Wood
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..