भाकर अन् शिक्षणाची सोय करायची कशी..कोरोनाने कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने महिलांपुढे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाकर अन् शिक्षणाची सोय करायची कशी..

भाकर अन् शिक्षणाची सोय करायची कशी..

वावडे (ता. अमळनेर) : घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने बळी गेल्याने अनेक कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबांतील महिला व मुलांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलाबाळांच्या भाकरीची अन् शिक्षणाची सोय कशी करायची, असा प्रश्‍न अशा कुटुंबातील महिलांन पुढे उभा ठाकला आहे. (corona-death-husband-and-Crisis-in-front-of-women)

कोरोनाच्या पहिल्या अन् दुसऱ्या लाटेतही अमळनेर शहरासह तालुका मृत्यूचे हॉटस्पॉट ठरले होते. आठवणींच्या धगधगत्या ज्वाळा शांत होत असल्या तरी जखमा कायम आहेत. या काळात पती-पत्नी, सख्खे भाऊ, पिता-पुत्र अशा शेकडो मृत्यू झाले. त्यात घरातील अनेक कर्ते गेले. ज्याच्या कष्टावर घरातील चूल पेटत होती, तोच न राहिल्याने सामान्य कुटुंबातील महिला, मुले निराधार झाली आहेत. शेती नाही, बँकेत ठेव नाही, निश्‍चित रोजगार मिळेल असा व्यवसाय नाही.

हेही वाचा: शेतात नाही युरियाचा 'दाणा' तरी कृषिभूषण ठरले वडणेचे 'दिलीपनाना'

माहेरीही हातावरचे पोट

गृहिणी म्हणून कुटुंबाचा गाडा हाकलेल्या महिलांना रोजंदारीच्या कामाचा अनुभव नाही. माहेरच्या मंडळीचेही हातावरचे पोट आणि सासरचीही तीच तऱ्हा, यामुळे नातेवाइकांकडून काहीही मदत होण्याची आशाही धूसरच, अशी पुरुष गमावलेल्या कुटुंबातील महिलांची व्यथा आहे. काही कुटुंबात तर आई-वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुले पोरकी झाली आहेत. शासनाने ठोस आर्थिक मदत देऊन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली तरच ही मोडून पडलेली कुटुंबे काही प्रमाणात सावरतील.

‘त्यांना’ हवाय आधार!

उपचारावर लाखो रुपये खर्च करूनही घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाला. अनेकांनी जवळचे किडूकमिडूक मोडून प्रसंगी उसने पैसे आणि कर्ज घेऊन उपचार केले; मात्र कोरोना जिंकला आणि माणसे हरली. मात्र, आता अशा कुटुंबांना आधार देण्याची गरज आहे. शासनाने कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करावे, त्यांना आर्थिक आधार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.