esakal | ठंडा ठंडा कुल कुल..कुलरची हवा नव्हे; तर व्यवसायच

बोलून बातमी शोधा

desert cooler

ठंडा ठंडा कुल कुल..कुलरची हवा नव्हे; तर व्यवसायच

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : जळगाव जिल्‍हा म्‍हणजे तापमानाच्या बाबतीत नेहमीच हॉटस्‍पॉट राहत असतो. जिल्‍ह्‍यातील पारा ४६- ४७ अंश सेल्‍सिअसच्यावर राहत असल्‍याने असह्य होणाऱ्या झळांमध्ये थंडावा मिळविण्याचा प्रयत्‍न होत असतो. यामुळे जळगावात डेझर्ट कुलरची मागणी असते. परिणामी महिना- दोन महिन्याच्या कालावधीत कोट्यावधीची उलाढाल होत असते. यंदा मात्र होलसेल व रिटेल विक्रेत्‍यांचा धंदाच थंड झाला आहे.

तापमानात प्रचंड वाढ होऊन जळगावचा पारा सातत्याने ४५ अंशावर राहतो. यामुळे आता उकाडा देखील जाणवू लागतो. दुपारी उष्णतेचे चटके बसू लागल्याने घरात बसणेदेखील कठीण झाले आहे. परिणामी पंखे, कूलरची मागणी वाढते. यंदा मात्र कोरोनाच्या वाढत्‍या कहरमध्ये लागलेला लॉकडाउन तसेच वातावरणात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलामुळे उन्हाची तिव्रता जाणवत नाही. उन्हाळ्यात दरवर्षी जिल्ह्यात दिवसाला किमान पाचशे ते सहाशे कुलर्सची विक्री होत असते. यंदा मात्र हे चित्र उलटे झाले आहे.

दोन ते पाच फुटाचे कुलर

जिल्ह्यात दरवर्षीचे तापमान चाळीशीच्यावर राहत असल्याने कुलर, एअरकंडिशनची मागणी वाढत असते. तसेच आवश्‍यकतेप्रमाणे बनवून घेतलेल्या कुलरला अधिक मागणी होते. वजनाने जड, टिकाऊ असणाऱ्या २४ गेजच्या पत्र्याचे आवरण, पाणी टिकून ठेवणाऱ्या गवताच्या जाळ्या कुलरला लावलेल्या असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार, खिडकी व खोलीत ठेवण्यासाठी दोन ते पाच फुटांपर्यंत कुलर बनवून दिले जातात.

डेझर्ट कुलरमध्ये होते कोट्यवधींची उलाढाल

डेझर्ट कुलर म्हणजे पत्री- लोखंडी कुलर बनवून घेण्याकडे नागरिकांचा कल असतो. परंतु, सध्या स्‍टील बॉडी आणि अनब्रेकेबल फायबर बॉडीचे डेझर्ट कुलर आल्‍याने त्‍यांची मागणी वाढली आहे. जळगाव शहरात आठ ते दहा होलसेल व्यावसायिक या क्षेत्रात कार्यरत आहेत. या होलसेल विक्रेत्यांकडून किमान वीस हजार कुलर दरवर्षी विक्रीला जातात. याशिवाय, इलेक्‍ट्रिकल्स दुकानदारांकडून देखील कुलर जातात. यात कुलरची उलाढाल ही कोट्यवधींत होत आहे.

यंदा व्यवसाय निम्‍मेपेक्षाही कमी

दरवर्षी कोट्यावधीची उलाढाल होणाऱ्या कुलरच्या व्यवसायात यंदा मंदी जाणवत आहे. यंदा तापमानात सातत्‍याने होत असलेला चढ- उताराचा परिणाम या व्यवसायावर जाणवत आहे. मुळात कोरोनामुळे लावण्यात आलेल्‍या लॉकडाउनमुळे होलसेल तसेच किरकोळ विक्रेत्‍यांकडून भरून ठेवलेला माल विक्रीस जात नाही. यामुळे यंदा कुलरचा व्यवसाय केवळ निम्‍म्‍यावर झाला आहे.

दरवर्षीची स्‍थिती (यंदाचे वर्ष सोडून)

- १०.................................... होलसेल कुलर विक्रेते.

- ५००.................................. कुलरची दिवसाला विक्री.

- २०००................................ एका होलसेलरकडील विक्री (संपूर्ण सीझन).

उन्हाळ्याच्या दिवसात डेझर्ट कुलरमध्ये मोठी उलाढाल असते. यंदा मात्र लॉकडाउनमुळे व्यवसाय निम्‍मेपेक्षा पण कमी झाला आहे. हा कुलर व्यावसायिकांसाठी फटका आहे.

- मनीष माहेश्‍वरी, कुलर विक्रेते.

काही राज्‍यांमध्ये गर्दी होत असताना तेथे कोरोना वाढत नाही का? आपल्‍याकडे कोरोनामुळे महिनाभरापासून लॉकडाउन लावण्यात आल्‍याने होलसेल आणि किरकोळ विक्रेत्‍यांचे हाल आहेत. वाहतुक आणि दुकान बंद असल्‍याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा कुलर व्यवसायावर ८० टक्‍के परिणाम जाणवत आहे.

मयुर जैन, चिंतामणी इले., होलसेल विक्रेते.