esakal | कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही..!

बोलून बातमी शोधा

coronavirus

कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही..!

sakal_logo
By
टिम इ सकाळ

चोपडा (जळगाव) : गेल्या दोन दिवसांत शहरात चोपडा नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरोडेखोरप्रमाणे दादागिरी चालू आहे. त्याला महाराष्ट्रात तोड नाही. सामान्य लोकांना त्रास देणे आणि कोणत्याही दुकानावर जाऊन पोलिस व नगरपालिकेचा कर्मचाऱ्यांचा ५० ते ६० लोकांचा ताफा सोशल डिस्टन्सचा वापर न करता गुंडगिरीप्रमाणे दुकानदारांना फक्त त्रास देणे, हाच एकमेव उद्देश ठेवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देणे हा प्रकार सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे, हे जेवढे ही कर्मचारी आहेत, त्या सर्वांचा पगार सुरू आहे. फक्त व्यापारी वर्गचा वर्षभरापासून पगार बंद आहे. इकडे कोणाचेही लक्ष नाही. कायदा फक्त सामान्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी नाही, असा आरोप चोपडा व्यापारी महामंडळाने केला आहे.

बंद असलेले दुकानाचे कुलूप उघडायला लावून व झुंडशाहीने दबाव टाकून जबरीने पाच ते दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा प्रकार सुरू आहे. गरीब बिचाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्यापेक्षा अधिकाऱ्यांची जे हप्ते वसुली व टक्केवारी सुरू आहे, याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार, असा सवाल महामंडळाने केलेला आहे. हा सर्व प्रकार सामान्य माणसाकडून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असताना पोलिसांकडून त्यालाही मारहाण करण्यात आली.

व्‍यापारी महामंडळाची तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वसामान्य माणसांकडून पोलिसांची दादागिरीने वसुली सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे व्यापारी महामंडळाने तक्रार केली आहे. हा प्रकार बंद करावा, अशी मागणी व्यापारी महामंडळ अध्यक्ष अमृतराज सचदेव, अनिल वानखेडे, भवरलाल जैन, श्याम परदेशी, संजय कानडे, सुनील बरडिया, संजय श्रावगी, श्याम सोनार, राजेंद्र जैन, प्रवीन जैन, संजय जैन यासह शेकडो व्यापाऱ्यांनी केली आहे.